शेतजमिनीत विषारी रसायनांचा डंप

| पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा परिसरातील धानसर गावाजवळील शेतजमिनीत घातक औद्योगिक रसायनांची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 200 पिंपांमध्ये भरलेली विषारी रसायने आणि 40 गोण्यांमध्ये साठवलेला घातक औद्योगिक कचरा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पर्यावरणावर मोठा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे क्षेत्र अधिकारी शिवानंद बसवडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. 6 मार्च रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास धानसर गावाबाहेरील मोकळ्या शेतजमिनीत तपासणी करण्यात आली असता हा प्रकार उघड झाला. तपासादरम्यान संबंधित शेतजमिनीत खड्डे करून त्यामध्ये घातक रसायने ओतण्यात आल्याचे आढळून आले. या रसायनांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असतानाही नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी मुंबईच्या साकीनाका परिसरात राहणारे मोहम्मद अली असगर अली खान (50) तसेच मुंब्रा येथील कौसा परिसरात राहणारे अफसर रहिस अहमद खान यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Exit mobile version