| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मुनवलीची नवसाला पावणारी दुर्गामाता म्हणून प्रसिद्ध आहे. मागील 40 वर्षांपासून याठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. ग्रामस्थांबरोबरच इतर गावातील, पंचक्रोशीतील, तालुका आणि जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा अनेक दुर्गाभक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. नवस बोलण्यासाठी येणाऱ्या भक्तांची उत्सवकाळात मोठी मांदियाळी पाहायला मिळते. उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळातील ज्येष्ठ, तरुण सभासदांसह ग्रामस्थांचाही मोठा हातभार असतो.
सुरुवातीच्या काळात गावकीच्या मंदिराच्या छोट्याशा जागेमध्ये दुर्गामातेचा उत्सव मंडळाचे सभासद आणि ग्रामस्थांकडून अगदी साध्या पद्धतीने साजरा करत असत. तेव्हापासून सुरू असलेला हा उत्सव आजही अखंडितपणे सुरू आहे. मनोभावे पूजाअर्चा करणाऱ्या कोणत्याही भक्ताला श्री दुर्गामाता नाराज करत नाही, अशी तिची ख्याती आहे. ज्या मंडळाच्या सभासदांनी दुर्गामातेच्या चरणी नवसाच्या रुपाने गाऱ्हाणं मांडलं होतं, तो पूर्णत्वास आला आणि त्या सभासदांचा आनंद गगनात मावेनासा झाला. नवस पूर्ण झालेल्या कुटुंबामध्ये आनंदाचं.. जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. पाहता पाहता ही बातमी गावात सगळीकडे पसरली. प्रत्येक जण मंडळाच्या सभासदांकडे श्री दुर्गामातेच्या उत्सवाविषयी आपुलकीने चौकशी करू लागला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि मग नवस बोलणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत गेली.
दरवर्षी दुर्गामातेच्या मकर सजावटीतून काहीना काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जातो. याही वर्षी मंडळाने निसर्गाची हानी झाल्यानंतर काय परिस्थिती उद्भवते तसेच कितीही आधुनिकीकरण झालं तरी गाव आणि गावातील वातावरण किती उपयोगी आहे, गरजेचे आहे, हे दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.





