। पुणे । प्रतिनिधी ।
न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्ट केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. यावेळी जय गणेश व्यासपीठाचे श्रीकांत शेटे, प्रसाद कुलकर्णी, सुनील रासने, प्रवीण परदेशी, नितीन पंडित, विकास पवार, शिरीष मोहिते, पियूष शहा आदी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शिंदे म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना ऐतिहासिक वारसा आहे. राज्यभरातून अनेकजण गणेशोत्सव पाहायला पुण्यात येतात. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मंडळांच्या काही मागण्या होत्या, त्याविषयी मंडळाच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. यंदा मंडळाना कोणतीही अडचण येणार नाही, जिल्हाधिकारी यामध्ये लक्ष घालतील.
न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूक काढू. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, याची योग्य खबरदारी घेतली जाईल. गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत उत्सव सुरू ठेवण्यास परवानगी असेल. मंडळे सामाजिक कामे करत आहेत. दहीहंडी मंडळालाही परवानगी देण्यात आली आहे असेही शिंदे यांनी नमूद केले.