। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील परहूर पाडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर सुरू असलेल्या सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेली गोळी थेट मंगेश शंकर नाईक यांच्या घरात घुसली. ही घटना गुरुवारी (दि.27) दुपारी 1 वाजता घडली. सातत्याने अशा थरारक घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची पोलीस प्रशासनाने तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आ. जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सरावाचे मैदान व गावाच्या मध्ये संरक्षक भिंत उभी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र भिंत असतानाही गोळ्या घरात येत असल्याने ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या गावामध्ये सुमारे सव्वादोनशे घरे आहेत. गुरुवारी दुपारी एक वाजता पोलिसांचा गोळीबार करण्याचा सराव सुरू असताना बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या कार्ले गावातील मंगेश शंकर नाईक यांच्या घराच्या छपरावरील पत्र्यातून घरात घुसली. त्यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. घरात गोळी घुसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांत कळविले. पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करतील, असे ग्रामस्थांना सांगण्यात आले.