येत्या मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठक
। पेण । प्रतिनिधी ।
दुरशेत गावातील पर्यायी रस्त्यासाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. यावेळी पर्यायी रस्त्यासाठी येत्या मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन प्रांत प्रवीण पवार यांनी दिले आहे.
पेणमधील दुरशेत येथील ग्रामस्थांनी अवजड वाहतुकीच्या विरोधात गेल्या महिन्यात रस्ता रोको केला होता. त्यावेळी तहसीलदारांच्यावतीने अवजड वाहतूक बंद करण्यात येईल. तसेच, पर्यायी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल, असे सांगितले होते. दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने गुरूवारी (दि.17) ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना नदीत जाण्यापासून मज्जाव केला. यावेळी प्रांत प्रवीण पवार यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेत येत्या मंगळवारी पर्यायी रस्त्याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन उदय गावंड, मिलिंद गावंड अजय भोईर व आंदोलकांना दिले. यावेळी ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले. पत्रकारांशी बोलताना प्रांत प्रवीण पवार यांनी सांगितले की, ग्रामस्थांची जी पर्यायी रस्त्याची मागणी आहे त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. परंतु, गौण खनिज उत्खननाच्य रीतसर परवानग्या असल्याचे देखी त्यांनी यावेळी सांगितले.






