अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

विकासाच्या नावाखाली जीवाशी खेळ

| सारळ | प्रतिनिधी |

अलिबाग-रेवस हा मार्ग रोज हजारो प्रवाशांसाठी जीवनरेषा आहे. नोकरदार वर्ग, विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटक या रस्त्यावरून सतत प्रवास करत असतात. परंतु, या मार्गालगत मोठ्या प्रमाणात विकास कामे व बांधकामे सुरू आहेत. या कामांसाठी लागणारी दगड, माती, खडी, रेती आणि इतर बांधकाम साहित्य वाहून नेणारे ट्रक व डंपर दिवसभर धावत असतात. परंतु, त्यातून हवेत उडणारी धूळ, सांडलेली खडी आणि बेदरकार वेग यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ट्रकमधील उडणारी धूळ ही मृत्यूची धूळ असून विकासाच्या नावाखाली प्रवासीवर्गाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अलिबाग-रेवस या मार्गादरम्यान अनेक विकास कामे सुरू आहेत. या मार्गालगतच अनेक इमारती, बंगल्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी लागणारी खडी, दगड, माती आणि इतर बांधकाम साहित्यांची वाहतूक मोठ्या प्रमणात होत आहे. परंतु, हे ट्रक पूर्णपणे झाकलेले नसतात. तसेच, या ट्रकचालकांची वेगावर देखील कोणतीच मर्यादा नसल्याचे येथील प्रवासी वर्गातून बोलले जात आहे. समोर एखादा खड्डा आला किंवा गतीरोधक आले की हे भरधाव ट्रकचालक अचानक ब्रेक लावतात. त्यामुळे ट्रकमधील खडी, दगड मातीसारखे सैल साहित्य भर रस्त्यावर सांडते. त्यामुळे संबंधित ट्रकच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांसह इतर लहान वाहने व पादचाऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ट्रकमधून उडणारी माती थेट प्रवाशांच्या नाका तोंडासह डोळ्यांत जाते. तसेच, रस्त्यावर सांडलेल्या खडी, दगडांमुळे दुचाकी सरकून पडण्याची व ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे अशा भरधाव ट्रकच्या मागून जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे. त्यातच या मार्गावरून मांडवा व रेवस येथील बोटसेवा आणि रो-रो सेवेच्या प्रवासी वर्गाची देखील मोठ्या प्रमाणात ये-जा असते. परिणामी हा मार्ग आता धोक्याचा झोन बनू लागला आहे.

त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून सैल साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रक-डंपरला पूर्णपणे कव्हर बंधनकारक करणे, वेगमर्यादेचे काटेकोर पालन, रस्त्यावर सांडलेली माती नियमित साफसफाई, धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी यासारख्या उपाययोजना त्वरित राबवणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली जर रोजचा प्रवासच जीवघेणा होत असेल, तर तो विकास नव्हे तर धोक्याची चाहूल आहे. त्यामुळे अलिबाग-रेवस हा मार्ग प्रशासनाच्या जबाबदारीची कसोटी बनला आहे. वेळीच पावले उचलली नाहीत, तर ही धूळ दुर्घटनेच्या धुरात बदलून जाण्यात वेळ लागणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया प्रवासी वर्गातून उमटत आहे.

स्थानिक प्रवासी संतप्त
काहीवेळा ट्रकमधील मातीचे प्रमाण इतके जास्त असते की वाऱ्यासोबत ती उडत राहते आणि पादचाऱ्यांसह दुचाकी चालकांच्या डोळ्यांत जाऊन इजा होते. तसेच, खडी व रेती सारखे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून त्याच्यावरून वाहन सरकून भीषण अपघाताची देखील शक्यता आहे. त्यामुळे माती किंवा सैल साहित्य वाहून नेताना ते पूर्णपणे झाकणे बंधनकारक नाही का? वाहतूक विभाग किंवा संबंधित बांधकाम विभाग यासाठी काही आचारसंहिता पाळत नाहीत का? विकासकामे महत्त्वाचीच; परंतु, त्या बदल्यात नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड का? असे संतप्त प्रश्न स्थानिक प्रवासी वर्गातून उमटत आहेत.
Exit mobile version