कळंबोळीत वायू गुणवत्ता निर्देशांक 330 वर
| पनवेल | वार्ताहर |
दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 450 च्या पुढे रविवारी नोंदविला गेला, तर महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील कळंबोली या उपनगरातील महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने कायमस्वरुपी लावलेल्या वायू गुणवत्ता निर्देशांक मोजमापासाठी लावलेल्या तपासणी यंत्रात मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता वायू गुणवत्ता निर्देशांक 330 वर पोहचल्याने कळंबोलीकरांसोबत पनवेलकरही धास्तावले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लावलेल्या या तपासणी यंत्रावर देखरेख करण्यासाठी रात्रपाळीला कोणतेही अधिकारी नाहीत. तसेच नेमकी हवेची गुणवत्ता का ढासळतेय याचा अभ्यास करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना रात्रपाळीकरुन वायू प्रदूषणाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता खारघर येथील रहिवाशी कळंबोली येथील वायू गुणवत्ता तपासणा-या मीटरकडे रात्रभर लक्ष देऊन होते.
मागील चार दिवसांपासून पनवेलच्या हवेमध्ये धूरक्यांसोबत धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंंत्रण मंडळाने (एमपीसीबी) तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर असेच एक यंत्र प्रदूषण मोजमापासाठी बसवले आहे. काही दिवसांपूर्वी या यंत्रांत बिघाड झाला होता. मात्र मंगळवारी रात्री या यंत्रात दर्शविलेला वायू गुणवत्ता निर्देशांक 180 हून कमी असल्याचा नोंदविला होता. खारघरमध्ये राहणारे शिंदे गटाचे पदाधिकारी मंगेश रानवडे आणि पर्यावरणावर काम कऱणा-या कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी याविषयी समाजमाध्यमांवर मंगळवारी रात्री लक्ष वेधले. रानवडे व नाडकर्णी या दोघांनी रात्र जागून कळंबोलीतील हवेची गुणवत्ता तपासणा-या यंत्रातील घेतलेल्या नोंदीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी यावर काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पनवेलच्या पश्चिमेला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दिवसरात्र सूरु आहे. पनवेलच्या भोवताली 80 विविध खदाणींमधून खडी व दगड उत्खणण सूरु आहेत. पनवेलच्या उत्तरेला तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये नागरी घनकचरा प्रकल्पासोबत 60 घातक रसायनांची हाताळणी करणारे कारखाने तसेच घातक व टाकाऊ रसायनांची विल्हेवाट लावणारा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प आहेत. पूर्वेला बडोदा मुंबई महामार्गाचे काम दिवसरात्र सूरु आहे. यामुळे हवेच्या दिशेने वायुतील प्रदुषण परिसरात पसरत आहेत. यामुळे श्वसनदाह रुग्णांची संख्या वाढते आहे.