। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु, या चौपदरीकरणासाठी वापरण्यात येणारी माती, सिमेंट, खडी रस्त्यावर पडत असल्यामुळे या महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खांब, पुई, कोलाड बाजारपेठ ते तळवली रातवड या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे येथे प्रचंड धूळ पसरत आहे. या धुळीमुळे वाहनचालकांसह प्रवासीवर्ग व रहिवाशी नागरिकां प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्याला पाण्याची फवारणी केली जात आहे. परंतु, या फवारणीमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. या चिखलातून मार्ग काढताना दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. यामुळे असंख्य प्रवाशी जखमी होत आहेत. तर, अनेकांचा नाहक बळी जात आहे. यामुळे याला जबादार कोण, असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे. कोलाड बाजारपेठेत तसेच तळवली, पुई, खांब येथील महामार्गवरील रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे वाहचालकांसहित, प्रवासी वर्ग, व्यापारी तसेच रहिवाशी नागरिक बेजार झाले आहेत. वेगाने ये-जा करणार्या वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान होत आहे. याला पर्याय म्हणून रस्त्यावर पाणी मारले जात आहे. परंतु, या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. तर, दोन तासांनी परिस्थिती जैसे थे अशीच होते. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.