| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
खराब रस्त्यामुळे ऐन सणासुदीला व बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व खरेदीसाठी पालीत येणाऱ्या नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. येथील जुने बस स्टॅन्ड ते बल्लाळेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे. या ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहे. तसेच पाली स्टेट बँक जवळ, सावंतआळी, रामआळी ते मधल्या आळी पर्यंतचा रस्ता, हटाळेश्वर मंदिर ते बस स्टॅन्ड, भोई आळी ते मिनिडोअर स्टँड पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा, मराठा समाज हॉल ते तहसील कार्यालय, बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणारा रस्ता प्रचंड खराब झाला आहे.
गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. तब्बल 2 ते 3 वेळा खडी व ग्रीट टाकून हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले आहेत. मात्र, अवजड व डंपर वाहतुकीमुळे पुन्हा खड्ड्यांनी डोकंवर काढले आहे. शिवाय खड्ड्यात टाकलेली खडी व ग्रीट बाहेर येऊन खूप मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. मोटारसायकल घसरून अपघात देखील होत आहेत. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयानक असे म्हणण्याची वेळ पालीकरांवर आली आहे. डंपर व अवजड वाहने गेल्याने खड्ड्यातील बारीक खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहने घसरतात. खड्डे व खडीमुळे पादचाऱ्यांना चालतांना कसरत करावी लागते. विद्यार्थी, महिला व वृद्धांची तर खूपच गैरसोय होते. खड्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी देखील होत आहे. प्रत्येकजण या खराब रस्त्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. धुळीवर पाण्याचा उतारा वारंवार धुरळा उडून तो रस्त्याशेजारील घरे व दुकानात जातो. त्यामुळे येथील प्रवाशी, नागरिक, व्यवसायिक व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाय म्हणून जुने बस स्थानक ते बल्लाळेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर नगरपंचायततर्फे टँकरद्वारे पाणी मारण्यात येत आहे. मात्र त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. काही काळ चिखल देखील होतो. तसेच उन्हाने पुन्हा रस्ता कोरडा झाल्यावर धरळा परत उडत आहे.
उपाय कुचकामी
नगरपंचायतीतर्फे गणपतीमध्ये येथील खड्ड्यात तात्पुरत्या स्वरूपात बारीक खडी व चुरा टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. त्यांनतर सिमेंट मिक्सर टाकून देखील रस्ते खड्डे मुक्त करण्यात आले होते. मात्र सतत डंपर व अवजड वाहनांची रेलचेल यामुळे खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आता तर हे खड्डे आणखी खोल व रुंद झाले आहेत.
खड्यांमुळे नागरीक व वाहन चालकांची वाताहत होत आहे. येथील नागरिकांसह येणारे भाविक देखील त्रस्त आहेत. काही ठिकाणचे रस्ते कित्येक वर्षे दुरुस्त देखील झाले नाहीत. याबरोबरच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण देखील वाढले आहेत. सण-उत्सव काळात प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने या गंभीर गोष्टीकडे लक्ष देऊन रस्ते सुस्थितीत व चांगल्या दर्जाचे करावेत.
-कपिल पाटील,
नागरिक, पाली
नागरिक व भाविकांच्या सोयीसाठी पालीतील रस्त्यांवरील खड्डे 2 ते 3 वेळा बुजविण्यात आले होते. मात्र, अतिवृष्टी व वाहनांची रेलचेल यामुळे पुन्हा खड्डे झाले आहेत. पुढील आठ दिवसांमध्ये रस्ते नूतनीकरणाचे काम करण्यात येईल. येथील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
– सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष नगरपंचायत, पाली







