टीम स्टारकरर्सची ऐरावत-2021 ई-बाईक सुसाट
भारतभरातून 212 संघांचा सहभाग
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शुभम देशमुख आणि अभिजित येईगे यांनी स्थापन केलेल्या सोनाई इलेक्ट्रिक मोबॅलिटी कंपनीने आयआयटी मुंबई उद्योजकता विभागातर्फे नवउद्योजकांसाठी ई-बाईक डिझाईन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भारतभरातून 212 संघांनी भाग घेतला होता. अनेक फेर्यांच्या छाननीनंतर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची टीम स्टारकरर्सने डिझाईन केलेली ऐरावत-2021 ही ई-बाईक विजेती ठरली.
शुक्रवार, 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिनानिमित्त सोनाई इलेक्ट्रिक मोबॅलिटी कंपनीने नवउद्योजकांसाठी आयोजित केलेल्या ई बाईक डिझाईन चॅलेंजचे निकाल उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. त्यानंतर विजेत्यांचा सत्कार केला. ही बाईक तन्मय तुरे (संघप्रमुख) याने डिझाईन केली असून, अभय तेली, केविन वोरा, तेजस शेट्टी आणि प्रणव उंडे यांंच्या स्वकष्टातून तयार झाली आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल टीम स्टारकरर्सला एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अरुण मोहपात्रा यांच्या नेतृत्वाखालील एनआयटी राउरकेलाच्या टीम गॉडस्पीड आणि चिन्मय गैरे यांच्या नेतृत्वाखालील एमआयटी इन्स्टिट्यूटने डिझाईन केलेली टीम व्होल्ट्रिक्स यांनी उपविजेतेपद मिळवले.
नवउद्योजकांसाठी ई-बाईक डिझाईन स्पर्धा
