बोर्लीपंचतन | वार्ताहर |
शेतकऱ्यांचे काम अधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सोपे आणि बिनचूक करण्यावर शासनाकडून भर देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून माझी शेती,माझा सातबारा,मीच नोंदविणार माझा पीकपेरा या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे व उपजिल्हाधिकारी भूसंपादन व पुनर्वसन तथा महसूल सप्ताह श्रीवर्धन उपविभाग नोडल अधिकारी भारत वाघमारे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे ई-पीक नोंदणी करण्याचे आवाहन केले असून त्यानुषंगाने श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी प्रदीप देवकांत यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी या गावी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी बाबत मार्गदर्शन केले.त्याचबरोबर ई-पीक पाहणी द्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंद न केल्याने आपल्या सातबाऱ्यामधील पिक पेरा कोरा राहील्यास पीक विमा,पिक कर्ज त्याचबरोबर कोणतीही शासकीय मदत कींवा अनुदान प्राप्त होण्यास येणाऱ्या अडचणीबाबत जागृती केली व मोबाईल प द्वारे लागवड केलेल्या क्षेत्राची ई-पीक नोंदणी करीत त्याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले.ई-पीक पाहणी व्हर्जन-2या पमुळे पिकांचे अचूक क्षेत्र वेळेत समजणार असून आर्थिक पाहणी, भविष्यातील कृषी नियोजन करणे शक्य होईल व नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना वेळेत अचूकपणे नुकसान भरपाई देण्यास तसेच पीक कर्जाचा लाभ देणे सुलभ होईल.त्यामुळे शासनाच्या ई-पीक पाहणी योजनेमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व त्याबाबत कोणतीही समस्या उद्भवल्यास महसूल विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.यावेळी दांडगुरी माजी सरपंच गजानन पाटील,कोतवाल रमाकांत पवार व शेतकरी बांधव उपस्थित होते.