अतिवृष्टीत करण्यात आलेले स्थलांतर
रसायनी | वार्ताहर |
आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन आदिवासीवाडीतील बांधवांचे अतिवृष्टीमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सतर्कतेच्या सूचना देत या बांधवांना त्यांच्या राहत्या घरी पाठविण्यात आले आहे.
माडभुवन ही डोंगराच्या पायथ्यालगत वसलेली आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनात आले. हा डोंगर कधीही खचून खाली येऊ शकते याची प्रत्यक्ष पाहणी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये आणि वन विभागाचे अधिकारी काटकर यांनी संयुक्तरीत्या केली. यावेळी तहसीलदार विजय पाटील यांनी तात्काळ निर्णय घेऊन जवळच असलेल्या गारमेंटच्या रिकाम्या इमारतीत ग्रामस्थांचे सुरक्षित स्थलांतर केले होते.
गेले पाच-सहा दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे स्थलांतरित ग्रामस्थांना पुन्हा आपल्या वाडीत राहत्या ठिकाणी जाण्यास सांगितले. तेथे राहत असताना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने ग्रामस्थांना दिल्या, तसेच यापुढे कधीही अतिवृष्टीचा धोका असेल त्यावेळेला तात्काळ सध्या स्थलांतरित केलेल्या जागेवर येण्याच्या सूचनादेखील केल्या आहेत. जि.प. माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत, मंडळ अधिकारी तुषार काकडे, तलाठी एस.टी. तवर, ग्रामसेविका वैशाली जाधव, माजी सरपंच दत्ता पाटील, रत्नाकर घरत, राजू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लेंडे आणि सर्व स्थलांतरित ग्रामस्थ उपस्थित होते.