ई-एज्युकेशन उपक्रम खेड्यापाड्यात राबविणार

विरेश कोठारी यांचे प्रतिपादन

| खांब-रोहा | नंदकुमार मरवडे |

खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षण सहजसोपे व्हावे यासाठी ई-एज्युकेशन उपक्रम खेड्यापाड्यात राबविणार असल्याची माहिती नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे चेअरमन विरेश कोठारी यांनी दिली. आपल्या भविष्यकालीन शैक्षणिक उपक्रमाबाबत माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

भविष्याकालीन विचार केला तर ऑनलाईन शिक्षण हे कालानुरूप गरजेचे असणार नाईटिंंगल चॅरिटेबल ट्रस्टचे माध्यमातून व निखिल दुधे, संदीप विचारे, अमित चौधरी, डॉ. असिफ कासकर, डॉ.गौतम त्रेहान, डॉ. अमरप्रित घुरा, असफक शेटे, अल्ताफ चोरडेकर, तौसिफ येरूणकर, जाफर येरूणकर, इक्बाल कासकर, सागर धरणकर यांच्या सहकार्याने ई-एज्युकेशन उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले.

त्यासाठी रोहा तालुक्यातील खेडेगावातील व दुर्गम भागातील काही शाळांची व हुशार विद्यार्थ्यांची निवड करून आम्ही आमचा हा उपक्रम राबविणार असून शाळांना वाय फाय सेवा तसेच मुलांना टॅब देऊन याची सुरुवात करणार असल्याचे कोठारी यानी सांगितले.

या मुलांना शिक्षण देण्यासाठी तज्ञांची नेमणूक करून त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना स्मार्ट बनविण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी, गणित, विज्ञान तसेच सामान्य ज्ञान आदीबाबतचे विषयांचे शिक्षण देऊन त्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याचे आमुचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. तर विरेश कोठारी यांच्या कार्याला दुजोरा देऊन विरेश कोठारी यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. असिफ कासकर यांनी दिली आहे.


Exit mobile version