ई-रिक्षा कोणासाठी वरदान?

स्थानिकांच्या रोजगारावर गदा; प्रवासाबाबत अनिश्‍चित धोरण
मार्गात सुधारणेची गरज

| नेरळ | संतोष पेरणे |

माथेरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या ई-रिक्षेचा फायदा नक्की माथेरानकर जनतेला होणार की येथील पर्यटनाला उभारी देण्यासाठी होणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, या ई-रिक्षामुळे माथेरानच्या दस्तुरी नाका येथील अश्‍वपालक आणि हात रिक्षाचालक यांचा व्यवसाय नक्कीच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तर, माथेरान आणि मिनीट्रेन हे पर्यटन व्यवसायाचे समीकरण आहे; परंतु, ई-रिक्षा सर्वांना उपलब्ध होणार असल्याने मिनीट्रेनच्या शटल सेवेवर आणि त्यातून मध्य रेल्वेच्या उत्पन्नावर होणारा दूरगामी परिणाम घोडे, हातरिक्षाप्रमाणे मिनीट्रेनसाठीदेखील धोक्याची चाहूल देणारा आहे.

माथेरानमध्ये पर्यावरणपूरक वाहने चालविली जावी आणि त्या माध्यमातून गावातून तीन चार किलोमीटर अंतरावरील शाळेत विद्यार्थ्यांना जाता यावे यासाठी ई-रिक्षा सुरू व्हावी यासाठी 2010च्या दशकात माथेरानकर असलेले आणि मुंबईत नोकरी करणारे शिक्षक सुनील शिंदे यांनी राज्य सरकारकडे आणि नंतर न्यायालयात लढण्यास सुरुवात झाली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळत नसल्याने त्यांनी नवी दिल्लीत सुप्रीम कोर्टात रिट दाखल केले. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश देत सुरू करण्याचा निर्णय दिला. त्यावेळी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत माथेरानचे पर्यटन टिकून राहावे यासाठी महत्वाची असलेली सनियंत्रण समितीच्या परवानगीनंतर ई-रिक्षा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यात माथेरान मधील रस्ते ई-रिक्षा चालविण्यासाठी पर्यावरण पूरक धूळ विरहित तयार करून घेण्यात नगरविकास विभाग यांच्या अखत्यारीत असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून क्ले पेव्हरचे बनविले गेले आणि त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने माथेरान गिरीस्थान नगरपरिषद कडून 5 डिसेंबर रोजी माथेरान मध्ये पर्यावरण पूरक बॅटरी ऑपरेटेड ई-रिक्षा सुरू झाली आहे.

पर्यटन वाढणार
मिनी ट्रेनची माथेरान अमन लॉज शटल सेवा झाल्यापासून माथेरान मध्ये आलेले पर्यटक सकाळी येवून संध्याकाळी पुन्हा परतीचा मार्ग धरतात हे देखील सिद्ध झाले आहे. त्यामुळे माथेरान मधील एक दिवसाचे पर्यटन ही नव्याने बसलेली बिरुदावली आता ई-रिक्षा मुळे आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा 5 डिसेंबर रोजी सुरू झाली. एक महिन्याच्या नंतर थोड्याफार प्रमाणात परिणाम जाणवू लागले आहेत. घोडेवाल्यांकडून या प्रोजेक्ट्ला कडाडून विरोध होत आहे तर व्यापारी आणि हातरीक्षावाले यांच्याकडून ई-रिक्षाला समर्थन मिळत आहे. त्यामुळे सध्यातरी येथे कुठे हसू तर कुठे अश्रू अशी स्थिती पहावयास मिळत आहे.

घोडेस्वारीचे काय होणार
प्रामुख्याने माथेरान मधील सर्वांचे हक्काचे वाहन असलेल्या घोड्यांच्या व्यवसायावर ई-रिक्षेचा परिणाम झालेला दिसून येत आहे. पर्यटकांना ई-रिक्षेचा पर्याय उपलब्ध झाल्याने घोड्यावरून शहरांत जाणारे पर्यटक प्रवासी यांची संख्या कमी झालेली आहे. आगामी काळात हा बदल झाल्यास माथेरानमधील ई-रिक्षा यांच्यामुळे घोडे व्यवसाय पार लयाला जाऊ शकतो. त्यात ही माथेरान मधील सर्व प्रेक्षणीय स्थळांवर ई-रिक्षा जाण्यास अनुमती मिळाले तर मात्र अश्‍व व्यवसाय बंद पडणार हे जवळपास नक्की आहे.

ई-रिक्षाच्या वेळात बदल
रिक्षा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला असून एका महिन्यात ई-रिक्षाच्या वेळापत्रकामध्ये सतत बदल होत गेले. सुरुवातीला सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वेळ दिला होता. पण घोडेवाल्यांचा सततच्या होत असलेल्या तक्रारीमुळे पालिकेने सकाळी 6 ते दुपारी 10 वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी तर दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी ई-रिक्षा उपलब्ध केल्या आहेत. शुक्रवार ते रविवार तसेच शाळेला सुट्टी असलेल्या तारखेला ई-रिक्षा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्थानिक व पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडे अहवालाची जबाबदारी
माथेरानमध्ये पाच डिसेंबरपासून प्रायोगिक तत्वावर सुरू ई-रिक्षाच्या प्रकल्पाचा सामाजिक व पर्यावरणाच्या अनुषंगाने होणार्‍या परिणामाचा अभ्यास अहवाल सादर करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था(टिस) मधील सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कमिटी मार्फत माथेरानवासीयांबरोबर ई-रिक्षा व इतर अनुषंगिक बाबी संबंधित चर्चा करण्यासाठी जनसभा आयोजित केली गेली आहे. त्यावेळी ई-रिक्षाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

अश्‍वपालकांचा कडाडून विरोध
ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर जसजसे दिवस जाऊ लागले तस तसे आपल्या व्यवसायावर परिणाम होताना दिसत असल्याचे जाणवताच महिला तसेच अश्‍वचालक यांनी मुख्याधिकारी भेट घेऊन ई-रिक्षा पर्यटकांना न देता त्या केवळ स्थानिकांना द्याव्या, अशी मागणी करण्यात आली. तर अश्‍वपाल संघटना ई-रिक्षाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बोलले जात आहे.

ई-रिक्षावर दगडफेक
5 डिसेंबरला ई-रिक्षा सुरू झाली शालेय विद्यार्थ्यांचा प्रथम विचार करत सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आणणे आणि घरी पोहोचवून दुपारी 3 नंतर पर्यटकांसाठी ई-रिक्षा धावत असताना काही अज्ञात समाजकंटकांकडून रिक्षावर दगडफेक करण्यात आली होती. माथेरान पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही करण्यात आली असून, ई रिक्षाच्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 5 डिसेंबर पासून प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा सुरू करण्यात आली आहे. तीन महिन्यानंतर आम्ही नगरपालिकेचा अहवाल सनियंत्रण समितीला सादर करणार आहोत. सध्या पर्यटकांपेक्षा स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

सुरेखा भणगे-शिंदे, प्रशासक आणि मुख्याधिकारी

आम्ही आता रोज ई-रिक्षांमध्ये शाळेत आणि घरी सुद्धा येतो. ई-रिक्षामुळे आमचा वेळ वाचला. आता शाळेत गेल्यावर शाळा भरण्याअगोदर सर्व मित्र मनसोक्त खेळतो. आता आमची आठ ते दहा किलोमीटरची पायपीट वाचली आहे.

विद्यार्थी

ई-रिक्षामुळे काही दुकानदार, लॉजिगधारक, हमाल व छोटे व्यावसायिक, घोडेवाल्यांचे नुकसान होताना दिसत आहे. या एक महिन्यात पर्यटक वाढले असले तरी एक दिवसात फिरून जाणार्‍यांची संख्यासुद्धा जास्त झाली आहे. त्यामुळे या गोष्टीचा सारासार विचार करून ई-रिक्षा स्थानिकांसाठी सुरू असावी, ती पर्यटकाना देण्यात येऊ नये. आज ई-रिक्षाची मागणी ज्यांच्या हॉटेलच्या दारापर्यंत जाणार आहे तेच मागणी करत आहेत. त्यामुळे ई-रिक्षा सर्वत्र धावू लागली तर गरीब हा आणखी गरीब होईल आणि अगोदरच श्रीमंत असलेले श्रीमंत होतील.

लहान दुकानदार
Exit mobile version