माथेरानमध्ये धावणार ई-रिक्षा

स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये जवळपास 160 वर्षांपासून अर्थातच ब्रिटिश कालखंडापासून हातरीक्षाचा वापर वाहतुकीसाठी केला जात आहे. ही अमानवीय प्रथा लवकरच संपुष्टात येणार असून पर्यावरण पूरक वाहतूक सुरू करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे. माथेरानच्या नागरिकांच्या वाहतुकी संदर्भातील विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी याचिकाकर्ते सुनिल शिंदे यांच्या सोबत चर्चा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि.13 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या सनियंत्रण समितीला दिले होते. या अनुषंगाने सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून समितीची सभा झाली. त्यावेळेस रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे. याचिकाकर्ते सुनिल शिंदे यांनी इको सेन्सेटिव्ह झोनच्या अधिसूचनेत वाहनांना बंदी घालण्यात आल्याने रहिवाशी, पर्यटक यांना हॉटेल व घरी जाणे फारच त्रासदायक ठरत आहे. पावसाळ्यात तर फारच हाल सोसावे लागतात. वाहन बंदी कायद्याचा फटका जीवनावश्यक वस्तूंना देखील बसत आहे. गॅसच्या टाक्या घरपोच दिल्या जात नसल्याने दीडशे ते दोनशे रुपये अधिक जास्त मोजावे लागतात, भाजीपाला, दूध, पाण्याच्या बाटल्या कोणतीच वस्तू रास्त भावात भेटत नाही. यासाठी कायमस्वरूपी पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था सुरू करणे काळाची गरज असल्याचे याचिकाकर्ते सुनिल शिंदे यांनी सांगितले. दरम्यान माथेरानमध्ये सातत्याने पाठपुरावा करणारे सुनील शिंदे यांच्या या महत्वाकांक्षी योजनेला लवकरच यश प्राप्त होणार असल्यामुळे खास करून व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version