ई-रिक्षा कायम सुरु ठेवणार

ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई-रिक्षा या सुरूच ठेवण्याचा आग्रह माथेरान गावातील ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ई-रिक्षा यांचा पायलट प्रकल्प संपत असल्याने माथेरानमधील ग्रामस्थ एकत्र आले होते.दरम्यान, माथेरानमधील पर्यटन वाढविणारा ई-रिक्षा या बंद करण्याचा प्रयत्न शासनाने केल्यास त्याला संपूर्ण गाव ई-रिक्षा चालक यांच्या पाठिशी उभा राहणार असल्याचे जाहीर केले.

माथेरानमधील ई-रिक्षा यांचा पायलट प्रकल्प या महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ई-रिक्षा चालक यांच्या वतीने ग्रामस्थांची बैठक लावण्यात आली होती. शहरातील कम्युनिटी सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला श्रमिक रिक्षा संघटना अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, माथेरान व्यापारी फेडरेशन अध्यक्ष राजेश चौधरी तसेच व्यापारी संतोष कदम, दीपक शाह ई-रिक्षा चालक शैलेश भोसले, नजिम महाबले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी 12 वर्षे न्यायालयीन लढाई लढणारे सुनील शिंदे यांनी मागील साडे अकरा महिने सुरू असलेल्या पर्यावरणपुरक ई-रिक्षा यांचा पायलट प्रकल्प यांनी माथेरान शहरात दिलेल्या सेवेची माहिती दिली. ई-रिक्षा चालक शैलेश भोसले यांनी माथेरान शहरातील वाढलेल्या पर्यटकांबद्दल माहिती देताना गेल्या वर्षी शहरात दररोज सहाशे ते साडे सहाशे पर्यटक येत होते. आज ई-रिक्षांची वाहतूक सहज उपलब्ध होत असल्याने दररोज दोन हजारहून अधिक पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे शाळेसाठी 15 रिक्षा तसेच पर्यटक यांच्यासाठी 50 हून अधिक रिक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यातून पर्यटन व्यवसाय अधिक बहरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

कुलदीप जाधव यांनी आपल्या सारखे शहर असलेल्या महाबळेश्‍वर मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन होता आणि मॉनिटरिंग कमिटीदेखील होती, मात्र तेथे जनतेने उठाव केला आणि त्यानंतर मॉनिटरिंग कमिटी शासनाने बरखास्त केली असल्याची माहिती देत आपल्या गावातील प्रश्‍न ठरविणारी मॉनिटरिंग कमिटी कोण सवाल केला. त्यावेळी शहरातील नागरिक आणि ग्रामस्थ यांनी थेट ई-रिक्षा यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याची भूमिका घ्यायला हवी असे स्पष्ट केले.

शिवाजी शिंदे यांनी माथेरान शहरातील पर्यटन वाढीस ई-रिक्षा महत्वाचे योगदान देत असल्याने शासनाने ई-रिक्षा सुरूच ठेवल्या पाहिजेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कुठेही पायलट प्रकल्प संपल्यावर ई-रिक्षा बंद ठेवल्या जातील असे कुठेही लिहिले नाही आणि त्यामुळे ई-रिक्षा सुरू ठेवण्यासाठी पाठीशी राहण्याची भूमिका स्पष्ट केली. तर प्रदीप घावरे यांनी शहरात कोणतीही समस्या उद्भवत असून रात्री दहा ही वेळ बदलून नवीन वेळ निश्‍चित करावी यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली.

गिरीश पवार यांनी ई-रिक्षा कायमस्वरुपी सुरू कशा राहतील यासाठी गावाने निर्णय घ्यावा आणि ठामपणे साथ द्यावी अशी मागणी केली. यावेळी आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव, वसंत कदम, जनार्दन पारटे, किरण चौधरी, राकेश चौधरी यांनीदेखील आपली भूमिका मांडली. या बैठकीला महिला ग्रामस्थदेखील आपल्या मुलांच्या शाळेत जाणार्‍या रिक्षा बंद होऊ नये हे सांगण्यासाठी उपस्थित होत्या.

माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा यांचा पायलट प्रकल्प सुरू आहे. मागील 11 महिने ई-रिक्षा यांची वाहतूक सुरू होती आणि त्यामुळे पायलट प्रकल्प संपल्यानंतर देखील ई-रिक्षा सुरू ठेवाव्यात अशी विनंती करणारी मागणी माथेरान ग्रामस्थांनी केली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेवून माथेरानमधील ग्रामस्थांनी ही मागणी केली असून त्यावर जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. माथेरान ग्रामस्थांच्या मागणीचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव, प्रवीण सकपाळ, तसेच किरण चौधरी, प्रदीप घावरे, राजेश चौधरी, संतोष कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Exit mobile version