| माथेरान | वार्ताहर |
माथेरानच्या पर्यटनवाढीसोबतच राजकारणाचा एक अविभाज्य भाग बनलेल्या ई-रिक्षामुळे इथल्या गल्लीबोळातले राजकारणसुद्धा रंगताना दिसत आहे. काही राजकीय पक्षांनी या ई-रिक्षाचा मुद्दा घेऊन पतसंस्था निवडणुकीत विजय मिळवला होता, तर काही गावाचे हित पाहणार्या राजकीय लोकांनी राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक विचार करून गावात सुविधा उपलब्ध व्हायलाच हव्यात याकामी ई-रिक्षासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावून परिणामाची चिंता न करता पतसंस्था निवडणुकीत पराभवाला सामोरे गेले आहेत.
मुळात, ज्यांनी ज्यांनी ई-रिक्षाला प्रखर विरोध दर्शवून राजकारण करून सर्वसामान्य लोकांची मते घेऊन पतसंस्थेत सत्ता स्थापन केली, तीच राजकीय पक्षांची मंडळी या ई-रिक्षाचा आपल्या घरापर्यंत वापर करताना दिसत आहेत. गावाच्या इतिहासात प्रथमच एक नाविन्यपूर्ण बदल ई-रिक्षाच्या माध्यमातून समस्त नागरिक अनुभवत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळीबरोबरच रुग्णांनासुध्दा या सेवेचा लाभ मोठ्या प्रमाणावर होत आहे. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने पर्यटकांना ही एक पर्वणीच ठरली आहे. मुळात, ई-रिक्षा सुरू व्हावी यासाठी राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी सहकार्याची भूमिका बजावली नव्हती, त्यांनी आपले हात झटकले होते. परंतु,रिक्षा संघटनेने जवळपास बारा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सनियंत्रण समितीच्या परवानगीने पायलट प्रोजेक्ट म्हणून या रिक्षा कार्यरत आहेत. पर्यटकांची वाढती संख्या पाहता वीस रिक्षा अपुर्या पडत आहेत. त्यासाठी सनियंत्रण समितीने लवकरच उर्वरित 74 रिक्षांना परवानगी देऊन इथे पर्यटन क्रांती घडवून आणावी, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.