नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
| माथेरान | प्रतिनिधी |
गेले अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या माथेरानमधील ई रिक्षाचा सोमवारी (दि.5) प्रारंभ करण्यात आला. या ई रिक्षा सेवेचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले आहे. नागरिक, शालेय विद्यार्थी, दिव्यांग बांधव यांच्या मध्ये खूप आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. वाहतुकीसाठी अजून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. येणार्या पर्यटकांना देखील दस्तुरी नाक्यावरून माथेरान शहरात जाण्यासाठी स्वस्त दरात ई-रिक्षाची सुविधा मिळणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी मागील दहा वर्षापासून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 12 मे रोजी प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता. यासाठी एक समितीसुद्धा स्थापन करण्यात आली आहे. माथेरान नगरपालिकेने याची अंमलबजावणी करीत शहरात बॅटरी ऑपरेटर प्रदूषण मुक्त ई-रिक्षा सुरू केल्या आहेत.ई-रिक्षाला शालेय विद्यार्थ्यांकडून हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या ई-रिक्षा माथेरान दस्तुरी नाक्यापासून ते सेंट झेव्हियर शाळे पर्यंत धावणार आहेत. इतरत्र कोणत्याही पॉइंटवर यांना जाण्यास परवानगी नाही.
ई रिक्षाचे दरपत्रक
शालेय विद्यार्थ्यांसाठी याचे भाडे 5 रु तर इतर प्रवाशांसाठी दस्तुरी नाका ते सेंट झेव्हियर शाळेपर्यंत (पांडे रोड) 35 रु दर निश्चित करण्यात आले आहे. सकाळी 6:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत या रिक्षा धावणार आहेत. रात्री 10 नंतर अत्यावश्यक सेवेकरिता गरज भासल्यास ई -रिक्षा धावली जाऊ शकते, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
पाच रिक्षा उपलब्ध
आत्ता सध्या पाच ई-रिक्षा माथेरान मध्ये दाखल झाल्या असून, अजून दोन ई-रिक्षा लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत. आणि प्रथम येणार्या प्रवाशाला प्राधान्य दिले जाणार असून या ई-रिक्षाचे तिकीट दस्तुरी नाका आणि रेल्वे स्टेशन येथील खिडकीवर मिळणार आहे. असे देखील यावेळी सांगण्यात आले.
ई-रिक्षा प्रयोगीग तत्वावर सुरू करण्यासठी माथेरान पालिका मुख्याधिकारी सुरेखा भणगे(शिंदे) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.