प्रकल्पबाधित शेतकर्यांचा विरोध
पोलीस बंदोबस्त न देण्यासाठी निवेदन
| पनवेल | वार्ताहर |
नैना प्रकल्पामुळे येथील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. याचप्रमाणे शेतकर्यांची पिढ्यान्पिढ्या पूर्वीची बांधलेली घरे सिडको/नैना बुलडोजर आणून तोडक कारवाई करत आहे. या तोडक कारवाईस सर्व शेतकर्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला असून, या कारवाईस पोलीस बंदोबस्त देऊ नये, असे निवेदन नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीतर्फे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.
सिडकोच्या या कृत्यामुळे भविष्यात येथील वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्यांना उद्ध्वस्त करणार्या सिडको/नैनाच्या तोडक कारवाईस पोलीस बंदोबस्त देऊ नये व सिडको/नैनाच्या संबंधित अधिकार्यांना शेतकर्यांच्या परवानगीशिवाय शेतकर्यांच्या मालमत्तेमध्ये प्रवेश करू नये, अशी समज द्यावी, अशा आशयाचे निवेदन शेतकर्यांतर्फे देण्यात आले आहे.
सिडको/नैनातर्फे पनवेल तालुक्यातील 23 गावांत नैना प्रकल्प सक्तीने व बळजबरीने राबवण्यात येत आहे. या प्रकल्पास या 23 गावांतील जनतेचा तीव्र विरोध असून, 2013 रोजी नैना प्रकल्पाची अधिसूचना जाहीर झाल्यावर प्रकल्पबाधित शेतकर्यांनी व सामाजिक संघटनांनी आपल्या तीव्र हरकती लेखी स्वरूपात सिडको/नैनास सादर केल्या आहेत. त्याचप्रमाणे या 23 गावांतील ग्रामपंचायती व ग्रामसभेने ठराव करून नैना प्रकल्पास आपली सहमती नसून विरोध आहे, असे लेखी स्वरूपात दिले आहे. तरीदेखील नैनाकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे नैनाच्या तोडक कारवाईस पोलीस बंदोबस्त देऊ नये यासाठी नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिति तर्फे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.