स्थानिकांसाठी ऐतिहासिक दिन
| माथेरान | वार्ताहर |
थंड हेवेचे ठिकाण आणि पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये आता ई-रिक्षा धावताना दिसणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बुधवार, दि. 27 जुलै रोजी ई-रिक्षाची चाचणी घेण्यात येणार आहे. हा दिवस खर्या अर्थाने माथेरानकरांसाठी एक अभूतपूर्व अन् ऐतिहासिक घटना ठरणार आहे. माथेरानमध्ये पर्यटनवाढीसाठी आणि एकंदरीतच व्यावसायिक दृष्टिकोनातून, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या, व्यापार्यांना वाहतुकीच्या सोयीसाठी, दूरवर बंगल्यात राहणार्या माळी कामगारांना, आबालवृद्धांना सुखकर प्रवासासाठी, अपंग, ज्येष्ठ पर्यटकांनासुद्धा या स्थळाचा आनंद उपभोगण्यासाठी, रुग्णांची जलदगतीने सोय होण्यासाठी आणि विशेष म्हणजे पर्यटकांना स्वस्तात प्रवासासाठी आगामी काळात ई-रिक्षा हेच एक उत्तम माध्यम ठरणार असल्याने इथे ई-रिक्षा सुरू व्हावी जेणेकरून आजवर रक्ताचे पाणी करत हातरिक्षा ओढून काबाडकष्ट करणार्या, या श्रमिकांनासुद्धा सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी मागील दहा वर्षांपासून शासन दरबारी अविरतपणे पाठपुरावा करणारे श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदेंच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. ई-रिक्षा हे माथेरानकरांसाठी एक स्वप्नवत सत्य प्रत्यक्षात साकारणार आहे. अत्यंत आनंदाने या अभूतपूर्व सोहळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हायला हवे, असे माथेरान नगरीच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले आहे.
स्वागताची लगबग
याच ई-रिक्षांच्या माध्यमातून चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांची चार ते पाच किलोमीटरची पायपीट थांबणार आहे. त्यामुळेच या ई-रिक्षाच्या चाचणीसाठी येणार्या शासकीय अधिकारीवर्गाच्या त्याचप्रमाणे सनियंत्रण समितीच्या पदाधिकार्यांचे फलकाद्वारे स्वागत करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची आतापासूनच लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
न्यायालयाचा हिरवा कंदील
सर्वोच्च न्यायालयाने दि. 12 मे रोजी ई-रिक्षाच्या चाचणीसाठी हिरवा कंदील दिलेला आहे. त्या अनुषंगाने मा महाराष्ट्र शासन, मा माथेरान सनियंत्रण समिती आणि माथेरान गिरीस्थान नगरपरिषदने, सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केली असून, त्याचाच एक भाग म्हणून आपल्याकडे प्राप्त 06 एजख नुसार सदर ई-रिक्षांची प्रत्यक्ष परीक्षण चाचणी, सनियंत्रण समिती व जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या सूचनेनुसार आणि निर्देशनुसार दि.27 जुलै रोजी एसडीओ, प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांच्या निरीक्षणाखाली डीवायएसपी कर्जत, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक अधिकारी, अधीक्षक, वनक्षेत्रपाल, प्रभारी पोलीस निरीक्षक आणि माथेरान गिरीस्थान नगरपरिषदचे अधिकारी यांच्या समितीच्या उपस्थितीत होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून सर्व प्रकिया पार पाडली जाणार आहे. खूप वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाचा अंतिम टप्पा जवळ आलाय. आपल्या शहरातील सर्वांच्या इच्छा, आकांक्षामुळे आणि शासनाच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे. आपण आपल्या या नगरीत पर्यावरणपूरक वाहतुकीच्या या नवीन सदस्याचे आनंदाने स्वागत करूयात.
सुरेखा भणगे, मुख्याधिकारी तथा प्रशासक