महाडमध्ये ई-टॉयलेट योजना अपयशी

पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने सर्वत्र दुर्गंधी
। महाड । प्रतिनिधी ।
महाड नगरपालिकेने शहराच्या काही भागांमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी ई-टॉयलेट्स उभी केली. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; परंतु नागरिकांची मते जाणून न घेता सुरु करण्यात आलेल्या इ-टॉयलेट सेवे कडे नागरिकांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. इ-टॉयलेटचा वापर कशा प्रकारे करावा याची माहिती नसल्याने त्याचा वापर करण्यासाठी गेलेले टॉयलेटच्या केबिनमध्ये अडकून पडले, यामुळे त्याचा वापर होत नसल्याने टॉयलेटच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर देशात चांगले नावदेखील कमविले, पुरस्कारदेखील मिळविले, राज्य आणि केंद्राने सुरु केलेल्या स्वच्छता अभियानांत आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या हेतूने इ-टॉयलेट संकल्पना पुढे आणली आणि शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या लायन्स क्लब हॉलसमोर इ-टॉयलेटचा प्रकल्प उभारण्यात आला. पालिकेने आधुनिकतेकडे उचलेल्या पावलाचे नागरिकांनी स्वागत केले.परंतु, कालांतराने असे निदर्शनाला आले, की नागरिक इ-टॉयलेट वापरण्यास तयार नसून आधुनिक पद्धतीने टॉयलेटचा वापर कशा प्रकारे करण्यात यावा याची माहितीच नसल्याने अखेर इ-टॉयलेट संकल्पनेला नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्या टॉयलेटचा वापर होत नसल्याने अखेर बंद अवस्थेत असलेल्या इ-टॉयलेटच्या दुर्गंधीचा नागरिकाना त्रास होण्यास सुरुवात झाली. अनेकजण इ-टॉयलेटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेचा वापर होण्यास सुरुवात झाली.


महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेशी ग्रामीण भागांचा जवळचा संबंध आहे. बाहेर गावाहून येणार्‍या नागरिकांची प्रवाशांची सतत वर्दळ असल्याने पालिका प्रशासनाकडून छ. शिवाजी महाराज चौकांमध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आले; परंतु त्या परिसरात असलेली दुर्गंधी अस्वच्छतेवरुन इ-टॉयलेट ही अत्याधुनिक टॉयलेट संकल्पना पालिकेने पुढे आली आणि त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला; परंतु इ-टॉयलेट उभारल्यापासून आजपर्यंत बंद असल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.


लाखो रुपयांचे नुकसान
इ-टॉयलेट उभारल्यापासून आजपर्यंत बंद असल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, इ-टॉयलेट पूर्णपणे स्वयंचलित असल्याने त्याचा वापर योग्य प्रकारे करावा लागतो. या ठिकाणी असलेल्या बॉक्समध्ये पाच रुपयांचे नाणे टाकण्यात आल्यानंतर टॉयलेटचा दरवाजा उघडण्यापासून ते पूर्ण स्वच्छता होईपर्यंत सर्व काही स्वयंचलित होते. याकरिता काही बटणांचा वापर करावा लागतो. हे टॉयलेट स्वयंचलित असून, सेन्सरच्या आधारे आतील स्वच्छता केली जाते.

Exit mobile version