लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक सामानांचा समावेश; डीआरआयची कारवाई
| चिरनेर | प्रतिनिधी |
बेकायदेशीरपणे विदेशातून चार कंटेनरमधून ॲल्युमिनियमच्या नावाखाली आयात करण्यात आलेला 23 कोटी किमतीचा ई-कचऱ्याचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी (दि.4) जप्त केला आहे. याप्रकरणी सुत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या आणि प्रतिबंध असतानाही जेएनपीए बंदरात ॲल्युमिनियमच्या नावाखाली चार कंटेनरमधुन हा ई-कचरा आयात करण्यात आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने संशयित चारही कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली. या तपासणीत ‘ॲल्युमिनियम ट्रीट स्क्रॅप’च्या नावाखाली भारतात ई-कचरा बेकायदेशीरपणे आयात केला असल्याची बाब समोर आली. यामध्ये एकूण 17,760 जुने आणि वापरलेले लॅपटॉप, 11,340 मिनी/बेअरबोन सीपीयू, 7,140 प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 23 कोटीच्या घरात असल्याची माहिती डीआरआय विभागाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी सुत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच तस्करीचे नियोजन, खरेदी आणि वित्तपुरवठा करण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे सांगितले. सरकारी धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षितता धोक्यात येते. अशा प्रतिबंधित वस्तूंची भंगार म्हणून विल्हेवाट लावायची असते. मात्र, अशा बेकायदेशीर मालाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.







