कविता पाठ नाही म्हणून 12 वर्षीय विद्यार्थीनीला मारहाण; शिक्षिका अडचणीत

। पनवेल । वार्ताहर ।
हरिग्राम येथील अशोक माळी यांची 12 वर्षीय मुलगी एंजल अशोक माळी हिला गुरुवारी (दि.7) शाळेतील शिक्षिकेने बेदम मारहाण केली. यामध्ये तिच्या कानाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी मारहाण करणार्‍या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षिकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

एंजल माळी ही केवाळे येथील रामकृष्ण अकॅडमी या शाळेत आठवीत शिकत आहे. कविता पाठ नसल्यावरून तिच्या शिक्षिका उज्जला जाधव यांनी तिला बेदम मारहाण केली. यामध्ये तिच्या कानाला जबर मार लागला असल्याचे तिच्या पालकांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे तसेच गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे शिक्षिकेविरोधात लेखी तक्रार केली आहे. तसेच शिक्षिकेवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी मुलीचे वडील अशोक माळी यांनी केली आहे.

कोव्हिडसारख्या महामारीच्या दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या. त्याचा ताण विद्यार्थ्यांवर जाणवत असताना असे प्रसंग घडत आहेत. याप्रकारणी माळी यांनी शाळेच्या मुख्याध्यपिकांकडे तक्रार केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे कळते. यापूर्वी ही अशा प्रकारच्या घटना या शाळेत घडल्या असून कोणावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याचे म्हंटले आहे.

एंजल माळीचा चुलत भाऊ यतिश दत्ता माळी याच्यावरही उज्जला जाधव याच शिक्षिकेकडून मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी त्याला चार दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ही या शिक्षिकेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी त्या शिक्षिकेवर संबंधित प्रशासन, अधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी व एंजल माळी हिला न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरिक समन्वय समितीचे कोकण अध्यक्ष प्रसाद हनुमंते यांनी केली आहे.

Exit mobile version