सरपंच वगळता सर्व 15 सदस्यांचे राजीनामे
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्या कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी (दि. 18) भूकंप झाला. सरपंच उषा पारधी या विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कारण देत सर्वच्या सर्व 15 सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंचांकडे सुपूर्द केले आहेत. याप्रकरणी भ्रष्टचाराचे आरोप झालेल्या महिला सरपंच उषा पारधी यांनी आपण राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमधील राजकारण आता थेट जनतेसमोर आले आहे. महिला सरपंच उषा पारधी या मनमानी करून प्रशासन चालवतात असा आरोप करून सरपंच वगळता अन्य सर्व 15 सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंचांकडे दिले आहेत. नेरळ ग्रामपंचायतीमधील या राजकीय भूकंप आणि घडामोडींमुळे सुप्त राजकारण बाहेर आले आहे. सरपंच उषा पारधी यांनी प्रशासन चालविता एकांगी कारभार केला, असा आरोप करून सरपंच वगळता अन्य सर्व 15 सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. सरपंच उषा पारधी यांची भेट घेऊन सर्व सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यात सत्ताधारी गटाचे 11 आणि विरोधी गटाच्या चार सदस्यांचा समावेश आहे. राजीनामा देणार्या सदस्यांमध्ये उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्य राजन लोभी, संतोष शिंगाडे, श्रद्धा कराळे, शंकर घोडविंदे, पार्वती चंचे, गीतांजली देशमुख, उमा खडे, शिवाली पोतदार, तर विरोधी पक्षाचे प्रथमेश मोरे, नितीन निरगुडे, शारदा सालेकर, पार्वती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल चंचे आदी सर्व सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी अरेरावीमुळे गावातील विकास झाला नाही. त्याचवेळी सरपंचपदावरती बसल्यापासून एक महिन्यानंतर मनमानी कारभाराला सुरुवात झाली. कोणत्याही सदस्याच्या सूचनेकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे गावाची परिस्थिती अशी दिसत आहे. सरपंच यांचे पती हे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत आणि ते मागील तीन वर्षे त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. कर्मचारी कृष्णा पारधी कोणत्याही प्रकारचे काम करत नाही, कर्मचार्यांवरती सरपंच यांच्या नावाने धाक दाखवतात. सरपंच या काही गृह निर्माण सोसायटीची पाण्याची बिले अधिकाराचा गैरवापर करून कमी करून घेतात.त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या घोटाळ्याची शासनाने चौकशी करायला हवी. काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीमधील कर्मचारी आंदोलनाला बसले होते.11 मार्च या दिवशी कामकाज संपल्यावर सरपंच या रात्री अकरा वाजेपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये बसून कागदपत्र रंगवत होत्या. त्यावेळी 15 युक्त आयोगाकडून सुमारे 14 लाख रुपये वस्तू खरेदीसाठी बिले अदा केले असून, त्यातील कोणत्याही वस्तूची खरेदी झालेली नाही. स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या पदाचा वापर करून ती बिले काढली. अशा भ्रष्ट सरपंचाच्या कारभाराला कंटाळून आम्ही सदस्य आज राजीनामा देत असल्याचे उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी जाहीर केले.विरोधी पक्षाच्या सदस्यांनीदेखील राजीनामे दिले असल्याने नेरळ गावातील ग्रामस्थांच्या समस्या कोण सोडविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे कशासाठी दिलेत याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. माझ्यावरती केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्याबद्दल मला कधीही ते काही बोलले नाही. माझे पती कृष्णा पारधी यांनी काही कुठे सह्या केल्या असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे. कुठल्या कर्मचार्यांनी काही भ्रष्टाचार केला असेल तर सिद्ध करावे. मात्र, मी माझ्या पदाचा राजीनामा देणार नाही.
उषा पारधी, सरपंच
सर्व सदस्यांचे राजीनामे माझ्याकडे सरपंचांकडून आले आहेत. त्या सर्व सदस्यांचे राजीनामे सह्यांची पडताळणी करण्यासाठी विशेष सभेत ठेवले जातील. त्यानंतर सभेच्या निर्णयाचा अहवाल कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पाठवून दिला जाईल.
अरुण कार्ले, ग्रामविकास अधिकारी