पेण शहराचा पूर्व भाग पाण्याखाली

अनधिकृत भरावाचा फटका

| पेण | प्रतिनिधी |

मागील दोन दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे भोगावती नदी पूर पातळी सोडून वाहत आहे. दरम्यान, पेण शहर पाण्याखाली गेले आहे. नैसर्गिक नाले व खाड्यांमध्ये महसूलच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन मनमानेल तसा भराव करुन बेकायदा बांधकामे आणि मोकळ्या जमिनीत झालेली वारेमाप झालेले भराव यामुळे पाणी निचर्‍याचे स्त्रोत बंद झाल्याने हा परिसर पाण्याखाली गेला आहे, असा आरोप पेणकरांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या आरोपांचे प्रशासनाकडून खंडन करण्यात आले असून, उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पेण शहर हे सुनियोजित शहर नसून, ऐतिहासिक शहर असल्याने त्याच्या अंतर्गत असलेली गटार रचना अरुंद आहे. त्याचप्रमाणे भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने भोगावती नदीचे पात्रदेखील अरुंद झाले आहे. पेण शहराच्या उत्कर्ष नगर, दातार आळी, कोंबडपाडा, पिंपळडोह, जुन्या आरटीओ कार्यालयाच्या मागे असणार्‍या वसाहतींमध्ये गेली दोन दिवस घरांमध्ये पाणी शिरत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, जलसंपदा खात्याचा बेजबाबदारपणा. तसेच जी काही पेण शहराच्या आजूबाजूने भराव सुरु आहेत. त्यावर महसूल खात्याची लगाम नाही. भोगावती नदीच्या पात्रातदेखील तोच प्रकार सुरू आहे. याचा सर्वस्वी फटका पेण नगरपालिका प्रशासनाला बसत आहे. गेली दोन दिवस पेण नगरपालिका आपत्कालीन व्यवस्थेच्या सहाय्याने पाण्याचा निचरा कसा होईल याकडे लक्ष देत आहेत. परंतु, त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही.


त्यातच काही लोकप्रतिनिधीदेखील मनमानी करुन नैसर्गिक पाण्याच्या निचर्‍याचे स्त्रोत बंद करु पाहात आहेत. काल उत्कर्ष नगरमध्ये जे काही घरांमध्ये पाणी शिरले त्यामागचे मोठे कारण हे होते की, एका माजी उपनगराध्यक्षाने स्वतःच्या जागेत भराव करुन नैसर्गिक निचरा होण्याचा पाण्याचा स्त्रोत बंद केला होता. मात्र, ही बाब आमच्या प्रतिनिधीच्या लक्षात येताच त्याने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी संपर्क साधला. मुख्याधिकार्‍यांनी तातडीने पाण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचना केल्या. त्यावेळेला नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी जेसीबी लावून पाण्याचा रस्ता मोकळा केल्याने सर्वसामान्यांच्या घरातील पाणी खाली झाले. अन्यथा त्यांना रात्री घरात झोपणेही कठीण झाले असते. हे एकच उदाहरण नसून, पेण शहराच्या बाजूने मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारचे भराव झालेले आहेत. नगरपालिका प्रशासनाने ठरविले तरी पाणी निचर्‍याचे मार्ग मोकळे करणे कठीणच आहे.

पेण शहराच्या पूर्व भागात गेली दोन दिवस पाणी आहे हे मान्य आहे. परंतु, नालेसफाई झाली नाही, हे बोलणे चुकीचे आहे. कारण, मे महिन्याच्या 25 तारखेच्या अगोदरच नालेसफाई झाली होती. परंतु, पेण शहाराच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात भराव झाल्याने पाण्याचा निचरा ज्या प्रमाणात व्हायला हवा, त्याप्रमाणे होत नाही. असे असतानादेखील नगरपालिकेची पूर्ण टीम नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी मेहनत घेत आहे.

जीवन पाटील,
मुख्याधिकारी

भोगावती नदीवर पूर्ण अधिकार हा जलसंपदा खात्याचा आहे. नदीच्या पात्रात अतिक्रमण केल्यास आम्ही दंडात्मक कारवाई करु शकतो. मात्र, कायदेशीर कारवाई ही जलसंपदा कार्यालयाने करणे गरजेचे आहे. आम्हाला काही मर्यादा आहेत. मात्र, पेण शहरातील पूरसदृश्य परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे.

तानाजी शेजाळ,
तहसीलदार
Exit mobile version