हायड्रो टेस्टींगचा आर्थिक बोजा

विजय पाटील यांची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

प्रवासी इको टॅक्सीतील सीएनजी बाटल्याची हायड्रो टेस्टींगसाठी एका एजन्सीकडून सुमारे दोन हजार 800 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे चालकांना हायड्रो टेस्टींगचा आर्थिक बोजा पडत असल्याचा आरोप रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक मालक संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी केला असून याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे.

डिझेलच्या वाढत्या दराबरोबरच प्रदुषण रोखण्यासाठी सीएनजीवर चालणार्‍या गाड्यांवर भर देण्यात आली. जिल्ह्यातील अनेकांनी सीएनजीवर चालणार्‍या प्रवासी वाहतूकीच्या इको टॅक्सी घेतल्या. अनेकांनी कर्ज काढून या गाड्या खरेदी केल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे दोन हजार इको टॅक्सी असून इतर गाड्यादेखील सीएनजीवर चालत आहे. या वाहनांच्या सीएनजी बाटल्यांची दर तीन वर्षांनी हायड्रो टेस्टींग केली जाते. हायड्रो टेस्टींगसाठी यापुर्वी एजन्सीद्वारे पाचशे ते आठशे रुपये दर आकारले जात होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दरात भरमसाठ वाढ झाल्याचा आरोप विजय पाटील यांनी केला आहे. हायड्रो टेस्टींगसाठी आता प्रवासी इको टॅक्सीचालकाससह मालकांना दोन हजार 800 रुपये मोजावे लागत आहेत. जुन्या दरात हीच टेस्टींग केली जात होती. तरीदेखील आता होणार्‍या टेस्टींगसाठी इतकी रक्कम का घेतली जाते, असा प्रश्‍न पाटील यांनी व्यक्त केला आहे.

उपप्रादेशिक परिवहन विभागाचे या एजन्सीवर नियंत्रण नसल्याचा फटका इको चालकांसह मालकांना बसत आहे. दर वाढीमुळे चालक व मालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे विजय पाटील यांनी लेखी तक्रार केली आहे.

Exit mobile version