दुबार शेतीने आर्थिक सक्षमता; माणगावच्या तालुक्याच्या उत्पन्नात भर

काळ प्रकल्पांतर्गत डोळवहाळ बंधार्‍यातून पाणीपुरवठा

| माणगाव | सलीम शेख |

माणगाव तालुक्यात काळ प्रकल्पांतर्गत डोळवहाळ बंधार्‍यातून होणार्‍या पाणीपुरवठ्यामुळे येथील अनेक गावांचा पाणीप्रश्‍न निकाली निघाला आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही मुबलक पाणी मिळत असल्याने उन्हाळी शेतीदेखील बहरली आहे. येथील शेतकरी आपल्या शेतात एकाच वेळी विविध पिकांची लागवड करीत असून, त्यातून उत्पन्नाही वाढ होत आहे. त्यामुळे आज माणगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक सक्षम होत असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माणगाव तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका आहे. डोलवहाळ बंधारा उभारणी पूर्वी या तालुक्यातील सुमारे दीडशे ते दोनशे गांवातील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट मैलनी मैल करावी लागत होती. तर खरीप हंगामा नंतर शेतकर्‍यांना अन्य रोजगाराचे साधने नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील तरुण-तरुणी मुंबई येथे स्थलांतरीत होऊन चाकरी करीत होते. मात्र, डोलवहाळ बंधार्‍यामुळे शेकडो गावांच्या पाणी पुरवठा योजनांना संजीवनी मिळाली असून, अनेक गावे टयांकर मुक्त झाली आहेत. तर हि एक पिकी शेती दु पिकी झाली. यामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला असून दुपिकी शेतीलाही संजीविनी मिळाली आहे. त्यामुळे दुबार शेतीची माणगावच्या उत्पन्नात भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सक्षम होत आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ विक्षेपण बंधारा बांधून भिरा येथील टाटा जलविद्युत केंद्रातून बाहेर पडणार्‍या अवजलावर काळ प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सन 1976 पासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात झाली. काळ प्रकल्पांतर्गत कालव्याच्या लांबीचे क्षेत्र कुंडलिका उजवा तीर कालवा 288 कि.मी., कुंडलिका डावा तीर कालवा 10 कि.मी., रोहा शाखा 21 कि.मी., मोर्बा शाखा 33 कि.मी., माणगाव शाखा 32 कि.मी., गोरेगाव शाखा 12 कि.मी., अंबा कालवा अशा प्रकारे वेगवेगळ्या कालव्यांतून त्यांच्या वितरिकामार्फत अगदी शेत ते शेत पाणीपुरवठ्याचे सिंचित केले जात आहे. माणगाव तालुक्यातील 76 व रोहा तालुक्यातील 48 गावांना उन्हाळी हंगामासाठी सिंचनासाठी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची शेती दुबार झाली आहे.

एकाच वेळी अनेक पिके
शेतकरी केवळ भातपिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या प्रकारची व्यापारी पिके ते आता घेऊ लागले आहेत. जसे कलिंगड, भेंडी, मुळा, माठ, शेपू, शिराळी, काकडी, रताळी, कडधान्य, शेकट, वांगी धणे अशा प्रकारची पिके शेतकरी आपल्या शेतात लागवड करू लागले आहेत. जो भाजीपाला पूर्वी मुंबई-पुणे, वाई, सातारा या भागातून आणला जात होता, तो भाजीपाला आता स्थानिक शेतकरीही पिकवू लागला आहे. त्यामुळे चांगला नफा मिळत असून, उत्पन्नात भर पडत आहे.

काळ प्रकल्पामुळे पाण्यासाठीची वणवण कायमची थांबली असून, पिण्यासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीकडे वळला असून, अधिकाधिक पिकांच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवत आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला येथेच काम मिळत असल्याने त्यांचे मुंबई, पुणे आदी शहरांकडे कामासाठी होत असणारे स्थलांतर थांबवण्यास मदत झाली आहे.

शेतकरी
Exit mobile version