नवाब मलिकांच्या मागे ईडी

। पुणे । प्रतिनिधी ।
वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात आज सात ठिकाणी छापे टाकले आहेत. गुरुवारी सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. मात्र पुण्यात नेमके कोणत्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. वक्फ बोर्ड हे अल्पसंख्याक मंत्रालयांतर्गत येत असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे यांच्याकडे हे मंत्रालय आहे. अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करत एनसीबीच्या कामकाजावर मलिक यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहे. तेव्हापासून मलिक चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर देखील काही आरोप केले आहेत. त्यानंतर काही तासांतच वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात ऑगस्ट महिन्यात दोघांना अटक केली होती. या अधिकार्‍यांवर पदावर असताना 7.76 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या अखत्यारीत घेतला आहे. यावर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. त्यांनी हा प्रकार वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घडला नसल्याचं सांगितलं. तसेच अन्य काही ठिकाणी छापे पडल्याचं त्यांनी मान्य केलंय.

वक्फ बोर्डाच्या संस्थांची चौकशी करा
वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण जेव्हा माझ्याकडे आले तेव्हापासून आपण कार्यवाही सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं. पारदर्शकपणे बोर्डाचे कामकाज सुरु राहावे असा प्रयत्न केला गेला आहे. बोर्डाची मिटींग होत नव्हती. सगळा मनमानीपणा होता. त्यामुळे आता त्याच्यावरही उपाययोजना करण्यात आली आहे. सगळे कामकाज आता डिजिटल पद्धतीनं सुरु झाले आहे. याशिवाय जी जूनी कागदपत्रे आहेत त्याचे स्कॅनिंग करुन त्यांना जतन करण्याचे काम सुरु झाले असल्याचे मलिक यांनी सांगितलं.

Exit mobile version