सोनिया गांधींची ईडी चौकशी; काँग्रेस आक्रमक, रायगडातही पडसाद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना समन्स बजावलेले आहे. ईडीकडून सुरु झालेल्या या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्ली, मुंबईसह, रायगड जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते रसत्यावर उतरत ईडी आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन केंद्र सरकारच्या निषेधाचे निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पूर्वग्रह दुषित हेतूने सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात जुन्या बंद झालेल्या प्रकरणावरून चौकशीला बोलाविले आहे. त्यांना हेतूपूरस्सर त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन केंद्र सरकारच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी मार्फत तळेकर यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, जिल्हा सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष लतीफ शेख, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष आदम ढलाईत, सुधीर मोरे, मोरेश्‍वर पाटील, अनुपमा चुढा, नीता शेनोय, डॉ. अमित दवे, आरती ठाकुर, अंजुम तेरवा, इ अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस नेते आणि खासदारांनी अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयापासून संसदेपर्यंत मोर्चा काढला आहे. तसेच पटना, बिहारमध्येही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सुरु असलेली कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तपास यंत्रणा मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशार्‍यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

केंद्र सरकार ईडीसह केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. लोकशाही धोक्यात आल्याचे हे लक्षण आहे. आमची लढाई देश वाचवण्यासाठी असल्याची टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

Exit mobile version