। रायगड । सुयोग आंग्रे ।
राज्यातील पहिले ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची एज्युकेशन हिस्ट्री तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधारकार्डनूसार 12 अंकी ‘अपार आयडी’ तयार करण्यात येणार आहे. केंद्र सरकार यासाठी आग्रही असून पुढील महिन्यात जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागातील संगणक विभागाच्या समन्वयकांना मुंबईमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने (एमपीएसपी) याबाबतचे पत्र पाठवत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राथमिक माहिती दिली आहे.
यापुढे पहिली ते बारावीला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याचा 12 अंकी अपार आयडी तयार करण्यात येणार आहे. या आयडीमध्ये संबंधित सर्व शैक्षणिक माहिती संकलित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रामाणिकरण झालेले आहे. त्या विद्यार्थ्यांचा यू- डायस प्रणालीमधून माहिती घेऊन ‘अपार आयडी’ तयार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला याबाबत सुचना करत विद्यार्थ्यांची एज्युकेशन हिस्ट्री तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील ज्या विद्यार्थ्यांची ‘आधार’ची माहिती प्रामाणिकरण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती अपार आयडीमध्ये टाकण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंत शैक्षणिक रेकॉर्ड तयार होणार आहे. यासाठी सरकारच्यावतीने पोर्टल विकसीत केलेले असून ते अपार आयडीचे काम पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित होणार आहे.
दरम्यान, याबाबत केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (एमपीएसपी) सुचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून प्रत्येक जिल्हा परिषदेला अपार आयडी प्रकल्पाबाबत अवगत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या तयार करण्यात येणार्या 12 अंकी अपार याडीचे काम सुरू करण्यापूर्वी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शिक्षण विभागातील संगणक विभागाच्या समन्वयकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये हे प्रशिक्षण मुंबईत होणार असून याबाबत सुचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार झाल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड तयार होणार असल्याने त्यांचे एका शाळेतून दुसर्या शाळेत होणारे स्थालांतर, जिल्ह्याबाहेर व राज्याबाहेर होणार्या स्थलांतरासह अन्य महत्वाचे ऑनलाईन रेकार्ड तयार होणार आहेत. यामुळे कोणत्या शाळेत किती पटसंख्या आहे. ती कमी किंवा जास्त याची माहिती सरकारला ऑनलाईन पाहता येणार आहे.
डिजीटल स्वरूपात माहिती उपलब्ध होणार
नव्याने विद्यार्थ्यांच्या तयार होणार्या अपार आयडीमुळे त्यांना देण्यात येणार्या शैक्षणिक सुविधांसह त्यांची अभ्यासातील प्रगतीचा अहवाल, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, प्रत्येक शाळेचा पट, शाळा गळतीचे अचूक प्रमाण आदीची माहिती ही डिजीटल पध्दतीने सरकारच्या नियंत्रणात उपलब्ध होणार आहे. यामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांचे धोरण आखतांना या माहितीचा मोठा उपयोग होणार आहे.
राज्य शिक्षण विभागाकडून अपार आयडी संदर्भातील सूचना रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आल्या आहेत. अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांना नवी ओळख मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकार्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांमार्फत अपार आयडीचे काम पूर्णत्वाकडे नेले जाणार आहे.
पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद






