। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सत्ताधारी अशांतता माजविण्याची व तरुण पिढी बरबाद करण्याची कुटिल खेळी खेळत आहेत. मात्र या भस्मासुराचा बंदोबस्त करण्यासाठी शेकाप सज्ज झाला आहे. तरुणांसाठी त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी रस्त्यावर उतरु, यासाठी एक नाही शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालेल, मात्र माझ्या कुटूंबातील लेकरं चुकीच्या मार्गाने जात असतील, त्यांचे भविष्य बिघडत असेल तर कदापी सहन करणार नाही, असा सज्जड इशारा शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
आजच्या स्थितीत तरुणांमधे नशेचे प्रमाण वाढून अतोनात नुकसान होत आहे. नशा आणि आनंदाच्या नावाखाली पार्टीत घुसखोरी केलेले नशेचे पदार्थ भयानक रुप घेत आहे. धक्कादायक म्हणजे आपल्याच अनेक विघातक शक्तीही यात उतरल्याने हा तरुण विक्राळ रूप धारण करत आहेत. कुटूंब उध्वस्त होत आहेत. व्यसनाचे जिल्ह्यात एक नवे संकट दाखल झाले आहे. सत्ताधारी मात्र या गंभीर प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यापासून फारच दूर आहे. उलट या प्रश्नावर आवाज उठविणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांकडून केला जात आहे.
राजकीय इच्छाशक्तीची गरज
नशेच्या या भस्मासुराचा बंदोबस्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची आणि राज्य व केंद्राने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. रिकाम्या हातांना काम उपलब्ध करून देणे हा भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणण्याचा एक महत्वाचा उपाय आहे. मात्र सत्ताधारी रोजगारावर बोलायला तयार नाहीत. तर व्यसनाधीन तरुणांच्या भविष्यावर केलेले भाष्य यांच्या पचनी पडले नाही. व्यसनाधीन तरुणांना योग्य मार्ग दाखविण्याऐवजी सत्ताधारी व्यसनाधीन तरुणांना पाठीशी घालत आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे. याविरोधात लढत असताना सत्ताधारी विघातक शक्ती सामाजिक समतोल आणि आरोग्य बिघडवण्याचा छुपा मार्ग अनुसरत आहेत. याला तोंड देण्यासाठी शेकाप खंबीरपणे उभा आहे, वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरेल. मात्र या लढ्यात फक्त शेकापलाच नाही तर सर्वांनाच तयार व्हावे लागेल, असे मत सामाजिक कार्यकर्त्या विद्या विलास म्हात्रे यांनी व्यक्त केले.
रोजगारावर टाच
रायगड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशातील बेरोजगारीची स्थिती भीषण आहे. शिक्षण घेतले पण नोकरी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोलमजूरी करुन, प्रसंगी पोटाला चिमटा काढून पालकांनी शिक्षण दिले, आणि सरकारने रोजगाराचे केवळ आश्वासन. बेरोजगारीच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत शेतकरी कामगार पक्षाने हजारो तरुणांच्या हाताला काम दिले, संसार उभा केला. कोणतंही राजकारण न करता केवळ समाजहितासाठी, तरुणांच्या उज्वल भवितव्यासाठी शेकाप काम करीत आहे. मात्र केवळ विरोधी भावना ठेऊन विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करीत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती प्रक्रियेला विरोध केला आणि सत्तेच्या जोरावर नोकरभरतीला स्थगिती दिली. व्यसनाधीन तरुणांचे भविष्य बिघडविणार्या सत्ताधार्यांमुळे आज अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे तरुणांची दिशाभूल करणार्या सत्ताधार्यांना महिला योग्य ती जागा दाखवतील, असा इशारा पेझारीच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सायली भगत यांनी दिला आहे.
महिलांचा अनादर
सत्ताधारी पक्षाने कायमच महिलांचा अनादर केला आहे. मंत्रिमंडळ विस्तापनातही सत्ताधार्यांनी महिलांवर अन्याय केला. तर अनेक महिला पदाधिकार्यांनी योग्य वागणूक न मिळाल्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे स्वतःच्या पक्षातील महिलांचाच अनादर करणारे सत्ताधारी अन्य पक्षातील महिलांचा काय आदर करणार, असा संतप्त सवाल तरुणांनी उपस्थित केला आहे.
तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यसनमुक्तीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र विरोधकांनी त्यांचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या घटनेने कोणीही घाबरुन बसणार नाही तर अधिक जोमाने व्यसनमुक्तीसाठी धडपडणार्या चित्रलेखा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू.
प्रतिक्षा पाटील,
अलिबाग
उद्या शेकापचा निषेध मोर्चा
पेझारी येथील मोर्चात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा अपमान केला. महिलेला दिलेल्या अपमानास्पद वागणूकीविरोधात शेकापच्या महिलांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिंदे गटाविरोधात निषेध नोंदविण्यासाठी उद्या पेझारी नाक्यावर शेकाप महिला पदाधिकार्यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. परिणामी, विभागातील महिलांनी सायंकाळी 4 वाजता पेझारी नाक्यावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भैरवी पाटील यांनी केले आहे.