। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आगामी शिक्षक दिनापासून शिक्षण बचाव मोहीम सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद-प्राथमिक, सिंधुदुर्ग यांनी माध्यमांना दिली आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग कोरोना नियमांचे पालन करून सुरू आहेत. पण वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून प्राथमिक शाळा बंद आहेत. यामुळे पायाभूत अभ्यासाचे नुकसान होत असून राज्यशासनाने आवश्यक ती पाउले उचलावीत, हा प्रश्न निकाली लागावा म्हणून हे आंदोलन आयोजित करण्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या आंदोलनाची पालकवर्गात चर्चा असून या आंदोलनामुळे अपेक्षित ते पदरी पडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थी, पालक, शिक्षक भरडले जात आहेत. त्यामुळे ही बाब लक्षात घेता, प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, शिक्षक हे पत्राद्वारे तर शिक्षक परिषद निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात येतील. – गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद-प्राथमिक, सिंधुदुर्ग