दिघी शाळेचे संतापजनक वास्तव; सत्तर विद्यार्थ्यांची जबाबदारी एका शिक्षकावर
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली असून, दिघी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती विशेषतः गंभीर बनली आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून या शाळेत पदोन्नतीने होणारी मुख्याध्यापकाची नियुक्ती न झाल्याने शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसत आहे.
दिघी येथील या जिल्हा परिषद शाळेत मराठी व अर्ध इंग्रजी (सेमी इंग्लिश) माध्यमाच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत प्रत्येकी एक असे एकूण आठ वर्ग आहेत. या शाळेत सध्या एकूण 293 विद्यार्थी शिक्षण घेत असून, सात शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, दोन शिक्षकांची कमतरता भासत असून, 2018 सालापासून मुख्याध्यापक पद रिक्त आहे. याच शाळेतील एका शिक्षकाकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रभारी मुख्याध्यापकांना अध्यापनासोबतच मुख्यालयीन दप्तराची कामे करावी लागत असल्याने वर्गाकडे आवश्यक तेवढे लक्ष देता येत नाही. परिणामी, सध्याच्या परिस्थितीत एका शिक्षकावर तब्बल सत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.
मुख्याध्यापक नसल्याने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या महत्त्वाच्या व स्पर्धात्मक अभियानाची अंमलबजावणीही शाळेत होत नाही. या अभियानांतर्गत शाळांचा भौतिक दर्जा सुधारण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यावर भर दिला जातो. जिल्हा व राज्य पातळीवर विजेत्या शाळांना मोठी रोख बक्षिसे दिली जातात; मात्र मुख्याध्यापक नसल्यामुळे दिघी शाळा या संधीपासून वंचित राहिली आहे.
तसेच मूल्यांकन, महावाचन अभियान, शालेय प्रशासन व नियोजन, शैक्षणिक पर्यवेक्षण, शालेय पोषण आहारात ताज्या पालेभाज्यांचा समावेश करण्यासाठी परसबाग उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी ‘सखी सावित्री समिती’ किंवा तक्रारपेटी यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. हे सर्व उपक्रम राबवणे, ही मुख्याध्यापकांची प्रशासकीय जबाबदारी असते.
सात वर्षांपासून मुख्याध्यापक पद रिक्त राहिल्यामुळे केवळ शाळेचेच नव्हे तर, विद्यार्थ्यांच्या भविष्याचेही मोठे नुकसान होत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
निष्क्रिय प्रभारी गटशिक्षणाधिकारी
दिघी येथील जिल्हा परिषद शाळेतील सात वर्षे रिक्त असलेले मुख्याध्यापक पद तसेच दोन शिक्षकांच्या रिक्त जागेबाबत श्रीवर्धन येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. अशा निष्क्रिय गटशिक्षणाधिकारी यांच्यावर शिक्षणाधिकारी ललिता दहितुले कारवाई करणार का?
या शाळेत तीन शिक्षकांची बदली झाली, त्या जागी फक्त शासनाने एक शिक्षक दिला. ही समस्या गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे मांडली असता त्यांनी सांगितले की, भरती प्रक्रिया झाली की शिक्षक तुम्हाला देऊ, पण आजपर्यंत शिक्षक दिले नाही. हीच व्यथा आम्ही शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांना सांगितली, त्यांनीही ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहेत, असे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत.शिक्षणाची कमतरता यामुळे पालक आपल्या पाल्याचे नुकसान होऊ नये याकरिता मुंबईला शिक्षणासाठी पाठवत आहेत. आम्ही पालक सभा घेऊन किंवा शाळा समिती असा निर्णय घेऊ की जर आम्हाला शिक्षक देत नसेल, तर शाळा बंद करू.
-विवेक मेंदाडकर,
रायगड जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष आणि पालक, दिघी







