बोर्लीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह मुरूड तालुक्यातील बोर्लीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.

शिक्षण सप्ताहातील प्रत्येक दिवस विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता. या सप्ताहाची सुरुवात अध्ययन अध्यापन साहित्य दिवस या उपक्रमाने झाली. मूलभूत संख्याज्ञान दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, डिजिटल उपक्रम, मिशन लाईफच्या दृष्टिकोनात इकोक्लब स्थापना शालेय पोषण आहार दिवस, शालेय पोषण दिवस असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.

शिक्षण सप्ताह या उपक्रमामुळे शिक्षण कौशल्य, शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे आकाश खुले झालेले दिसून आले. विद्यार्थ्यांना नेतृत्वाची संधी व मुक्त छंद जोपासण्यास वाव मिळाला. परस्परांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले. हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी बोर्ली केंद्रातील सर्व शाळेतील शाळाप्रमुख व शिक्षक वृंद सहभागी झाले होते. मुरुडचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, केंद्रप्रमुखा रेश्मा धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

Exit mobile version