प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमाचा
| अलिबाग | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांची बौध्दीक व शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. सोमवारी (दि.22) ते रविवारी (दि.28) जूलै या कालावधीत हा सप्ताह असणार आहे. या कालावधीत प्रत्येक दिवस विशिष्ट उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
अध्ययन व अध्यापन साहित्य दिवस, मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस, शालेय पोषण दिवस आणि समुदाय सहभाग दिवस असे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक दिवशी घेतले जाणार आहेत. या आठ दिवसांमध्ये विविध शिक्षण शैली, पर्यावरण विषयक जागरुकता वाढविणे, सहयोगी शिक्षण कौशल्य वाढविणे, उच्च गुणवत्ता आणि विविध शिक्षण आणि शिकण्याची सामग्री विकसित करणे, खेळाडूवृत्ती, नैतिक वर्तणूक यातील सकारात्मक वृत्ती विकसीत करणे, शारीरिक, मानसिक सामाजिक व भावनिक दृष्ट्या योग्य होण्यासाठी प्रयत्न करणे, विविध कार्यक्रम घेणे, करिअरचे मार्ग शोधण्यासाठी प्रेरित करणे, डिजीटल शिक्षणाचे फायदे ओळखण्याची तयारी करणे हा उद्देश समोर ठेवून हा सप्ताह सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये हा सप्ताह राबविला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी शासनाने शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. 22 ते 28 जूलै या कालावधीत हा सप्ताह असणार आहे. आठवडाभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दीक व शारिरीक प्रगतीला गती देण्याचा प्रयत्न आहे.
कृष्णा पिंगळा, गटशिक्षणाधिकारी, अलिबाग