। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत हद्दीतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि. 19) शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर ग्रामपंचायत कार्यालयातील स्वर्गीय उमेश दशरथ थळे सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील थळे, सरपंच उनिता थळे, उपसरपंच अनिता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, किशोर सातमकर, ग्रामविकास अधिकारी माधुरी भोईर, मापगाव विभाग महिला आघाडीच्या शलाका थळे आदी उपस्थित होते.
शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवत 45 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केलेले श्रीधर घरत तसेच 35 वर्षे 9 वी, 10 वीसाठी गणित हा विषय कोकण एज्युकेशन सोसायटी या संस्थेत शिकवणारे व अनेक पुरस्कार मिळवणारे मापगाव येथील शिक्षक संजय राऊत आणि मोटिवेशनल शिक्षक जॅकी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. तसेच श्रीधर घरत, संजय राऊत, जॅकी सर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शिबिराला 100 विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक जोशी यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विवेक जोशी, राजेंद्र घरत, संजय शिंदे यांनी मेहनत घेतली.