| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या जामरुंग येथील प्रभाकर पाटील माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना मुंबई गोरेगाव येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्याशिवाय या संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेची शाळा असलेल्या खांदन, सराईवाडी आणि हिरेवाडी येथील विद्यार्थ्यांनादेखील शैक्षणिक साहित्य यांची मदत वाटप करण्यात आली.
माहेश्वरी प्रगती मंडळ गोरेगाव क्षेत्रीय समिती मुंबई यांच्या वतीने ग्रामीण आदिवासी विभागातील प्रभाकर पाटील माध्य. विद्यालय जामरुंग, जिल्हा परिषद शाळा खांदन, सराईवाडी, हीरेवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये रजिस्टर वह्या, छोट्या वह्या, पेन, पेन्सिल, खोडरब्बर, श्रीधर, कंपासबॉक्स इत्यादी साहित्याचा समावेश होता. गेले पंधरा वर्षे या संस्थेच्या माध्यमातून या शाळांना शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य यांचे वाटप केले जात आहे. याप्रसंगी माहेश्वरी प्रगती मंडळ गोरेगावचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थ मंगेश दत्तात्रय सावंत, संतोष तुकाराम पिंपरकर, ग्रा.पं. सदस्या वनिता सावंत, शाळेचे मुख्याध्यापक पिंगळे आदी उपस्थित होते.