कोरोनाचा फटाक्यांची निर्मितीवर परिणाम

| नवीन पनवेल । वार्ताहर ।

कोरोनामुळे दोन वर्षे फटाक्यांची निर्मितीवर परिणाम झाला होता. अशातच दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे शासनाने विविध निर्बंधही टाकले आहेत. त्यामुळे फटाका निर्मितीवर त्याचा परिणाम झाला असून यंदा दिवाळीत विक्रीसाठी फटाके जास्त प्रमाणात उपलब्ध होणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे फटाके वितरक आणि फटाका विक्रेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दिवाळीसाठी नवी मुंबई, पनवेल, खारघर परिसरातील फटाके विक्रेते वाडा, ठाणे, भिवंडी आणि मस्जिद बंदर येथून फटाके खरेदी करून फटाका विक्री करतात. मात्र, यंदा फटाक्यांची निर्मिती कमी झाल्यामुळे फटाका स्टॉल विक्रेते वितरकांच्या शोधात आहेत. खारघरमध्ये प्रकल्पग्रस्त फटाका व्यापारी मालक चालक संस्थेकडून 47 तर खारघर नोड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे 12 असे जवळपास साठ फटाक्यांचे स्टॉल खारघर सेक्टर पंधरा घरकुल शेजारील मोकळ्या मैदानामध्ये असतात. या विक्रेत्यांनी स्टॉल उभारणीसाठी सर्व प्रकारच्या परवानगी प्राप्त केल्या आहेत. मात्र, वितरकाकडून पुरेसा फटाके उपलब्ध होत नसल्याने यंदा दिवाळीत बाजारात कमी प्रमाणात फटाके उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.

निर्बंधामुळे कमी निर्मिती
तमिळनाडूतील शिवकाशी गाव हे देशातील फटाके निर्मितीचे हे सर्वात मोठे केंद्र आहे. भारतातील 90 टक्के फटाके एकट्या शिवकाशीत तयार केले जातात. इथे जवळपास 2000 फटाके निर्माते आहेत. मात्र, दोन वर्षे कोरोनामुळे काही कारखाने बंद झाले. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे निर्बंधामुळे फटाके निर्मितीचे प्रमाण कमी झाले आहे.

खारघरमध्ये जवळपास 60 फटाके स्टॉल असतात. काहींनी फटाके विक्रीसाठी कर्ज काढून तर काहींनी दागिने गहाण टाकून पैसे उभारणी केली आहे. मात्र दोन वर्षे कोरोनामुळे फटाके निर्मिती करणारे काही कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे वितरकाकडून पुरेसा फटाके उपलब्ध होत नसल्यामुळे विक्रेते चिंतित आहेत.

फटाका व्यापारी मालक चालक संस्था खारघर.
Exit mobile version