भोगावती नदी संवर्धन महोत्सवात डॉ.आदित्य धोपटकर यांचे मार्गदर्शन
। पेण । वार्ताहर ।
समाज प्रबोधन मंचाच्या वतीने एक दिवसाचे भोगावती नदी संवर्धन महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना पशु वैद्यकीय, जल जैविक शेती व व्याघ्र संरक्षक डॉ. आदित्य धोपटकर यांनी नदीच्या प्रदूषणाचे वेगवेगळे कारणे सांगत असताना मुख्य म्हणजे नदीमध्ये जलपर्णी वाढण्याचे कारण युरीया हे आहे असे सांगितले.
आज उत्पन्न वाढवण्याच्या हव्यासापोटी आपण शेतीत रासायनिक खतांचा वापर करतो व ही रासायनिक खत जमिनीत मुरून पाण्याच्या निचर्याने जलप्रवाहत येत असतात. व या जलप्रवाहांमध्ये जलपर्णी वाढत असतात. आपण नद्यांमधून कितीही जलपर्णी काढली तरी ती पुन्हा वाढल्या शिवाय राहणार नाही. यासाठी पहिल्यांदा आपल्याला रासायनिक खतांवर मात करून जैविक खतांचा वापर करायला सुरूवात करावी लागेल. तसेच नदी प्रवाहामध्ये निर्माल्य टाकल्याने नदी प्रदूषण होत नाही. परंतु निर्माल्य टाकताना प्लॅस्टिक नावाच्या राक्षसास गुंडाळून निर्माल्य नदीत टाकतो. पुर्वी निर्माल्य म्हणजे काय असायच फुल, दोरा, पान इत्यादी. मात्र आज निर्माल्यांमध्ये फुल, दोर्यांबरोबर प्लॅस्टिक, चकचकी, थर्माकोल, आदींचा समावेश असतो व ते आपण सतत सतत टाकल्याने निर्माल्य कुजण्या ऐवजी सडू लागतो आणि दुर्गधीला सुरूवात होते. आणि त्यामुळेच नद्यांचे रुपांतर आपण गटारात करून टाकतो. ही नदी प्रदूषणे थांबवायची असतील तर जंगलवाडीला प्रोत्साहन द्यायला हवे. कारण जंगलच नदींना जन्म देतात. प्रत्येक नदीचा उगम हा जंगल, दर्या, डोंगरातूनच होत असतात. नदी विषय आपली नदी ही संकल्पना मनात रुजली पाहिजे. जो पर्यत सर्वांची नदी ही संकल्पना आहे तो पर्यंत नदीचे प्रदूषण होतच राहील. नदीचे प्रदूषण टाळायच असेल तर एक दिवसाचे काम करून भागणार नाही तर सतत वर्षानुवर्षे काम करावे लागेल असे डॉ. आदित्य धोपटकर यांनी सांगितले.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी मा.आ.धैर्यशिल पाटील, ज्येष्ठ समाज सुधारक अशोक भोईर, निसर्ग प्रेमी सतिश पोरे, संगणक तज्ञ अतुल वैदय, ह.ब.प.दिगंबर राउत, शिवसेना जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, नगरसेवक संतोष पाटील, कुस्ती पट्टू भाई पोटे, भूषण कडू, जयेश पाटील, सागर दाबके, तुलशिराम सावंत, मनिष देशमुख अदी उपस्थित होते.
पेण शहरात होणार्या पाणी पुरवठ्यासाठी भोगावती नदी पात्रातील पाणी उचलून ते जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. मात्र नदीपात्रात जलपर्णी व इतर कचरा टाकणार्या नागरिकांचे जो पर्यंत प्रबोधन होत नाही तो पर्यंत या उपक्रमांना अपेक्षित यश मिळणार नाही.
-प्रा.उदय मानकवळे, पर्यावरण अभ्यासक, पेण






