308 तक्रारींवरून एसटी प्रशासनाला नवी दिशा
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेवर अवलंबून असलेल्या लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800221251 हा एक महान आधार ठरला आहे. विद्यार्थ्यांची सोय आणि सुरक्षितता हा उदात्त हेतू ठेवून सुरू केलेल्या या हेल्पलाईनवर, अवघ्या काही दिवसांत (आठवड्यात) तब्बल 308 तक्रारींची नोंद झाली आहे. ही आकडेवारी तात्पुरती चिंता दर्शवत असली तरी, ती एसटी प्रशासनाला मूलभूत त्रुटी सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
आता थेट
‘ॲक्शन' मोडमध्ये!
नोंदवलेल्या तक्रारींमध्ये खालील गंभीर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहेत, ज्या आता थेट मंत्र्यांच्या निदर्शनाखाली आल्या आहेत, वेळेवर बस न येणे. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आता गांभीर्याने घेतले जात आहे. नियोजित थांब्यांवरही बस थांबत नसल्याच्या तक्रारींवर तातडीने लक्ष केंद्रित केले आहे. लांब पल्ल्याच्या बसमध्ये पासधारक शालेय विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची तयारी करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी तात्काळ हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाला न जुमानल्यास कठोर कारवाई करण्याची मानसिकता निर्माण होऊन व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत
तक्रार पेटी नव्हे,
100% निराकरण केंद्र
एसटी महामंडळाने आता केवळ हेल्पलाईनवर तक्रारींची नोंद न घेता, या 308 तक्रारींचा आधार घेऊन मूलभूत कामकाजात आणि कर्मचारी मानसिकतेत त्वरित सकारात्मक सुधारणा कराव्यात.असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करणे हे एसटी महामंडळाचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. एसटी महामंडळाने आता तक्रारींच्या 100 टक्के निराकरणावर लक्ष केंद्रित केल्यास, हा हेल्पलाईन क्रमांक केवळ तक्रार पेटी न राहता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे विश्वास केंद्र बनेल. असे मत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केले आहे.
हेल्पलाईनने विद्यार्थ्यांना मिळाला आधार
शालेय विद्यार्थ्यांना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी या हेतूने 1800221251 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. 31 विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना दिले आहेत. यामुळे शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडण्यास सुरूवात केली आहे.







