1200 हेक्टरवर भात लागवड
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका हा कृषिप्रधान तालुका असून, येथे पावसाळी हंगामात प्रामुख्याने भातपिकाची लागवड केली जाते. नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर आधारित हे पीक येथील शेतकऱ्यांसाठी मुख्य आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. यंदाच्या खरीप हंगामात माणगाव तालुक्यात एकूण 1200 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड होणार आहे. पारंपारिक देशी बियाण्यांबरोबरच दापोली कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या, तसेच कर्जत या सुधारित वाणांनाही शेतकरी अधिक पसंती देत आहेत.
माणगाव तालुका हा भात पिकाचा मुख्य पट्टा मानला जातो. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात अंदाजे 1, 200 हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गाने मशागत आणि पेरणीच्या हालचाली गतिमान केल्या असून, यंदा पारंपरिक बियाण्यांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या वाणांचीही निवड केली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी आजही पारंपरिक बियाण्यांची शेतात पेरणी करतात. या बियाण्यांना चव आणि पोषणमूल्यामुळे बाजारात विशेष मागणी आहे. मात्र, उत्पादनात सातत्य आणि उत्पन्न वाढीसाठी सुधारित वाणांचा स्वीकार करणे ही काळाची गरज बनली आहे.
या वर्षी शेतकरी पारंपरिक स्थानिक जातींसोबतच दापोली कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तसेच कर्जत या सुधारीत आणि उंच उत्पन्न देणाऱ्या नवीन भात वाणांकडे आकर्षित होत आहेत. विशेषतः भात पिकाच्या वाणांना अधिक मागणी असून, ही वाणे कमी कालावधीत जास्त उत्पादन देतात. त्याचबरोबर भात लागवडीसाठी शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करत असून शेतीमालाच्या विपणनासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी गट सक्रिय आहेत. शासनाच्या विविध योजना, अनुदानित बियाणे, प्रशिक्षण कार्यक्रम यांचा लाभ घेऊन माणगावातील भात शेती आता अधिक सक्षम आणि शाश्वत होत आहे.
पारंपरिकसह सुधारित भातपिकांची लागावड
तालुक्यात भात लावणीला पोषक वातावरण असून ज्या शेतकऱ्यांची रोप वाटिका लागवडी लायक झाली असेल त्यांनी लागवड सुरु केली आहे. त्यात जया व रत्ना ही पारंपारिक भात रोपांची वाणे, कर्जत संशोधन केंद्राने विकसित केलेली कर्जत 5, कर्जत 3, कर्जत 8, कर्जत 9, तर दापोली कृषी विद्यापीठाने विकसित केलेली रत्नागिरी 73, फोंडा घाट 1, रत्नागिरी 4, पालघर 2, रत्नागिरी 6, रत्नागिरी 8, रत्नागिरी 5, रत्नागिरी 1 व रत्नागिरी 7 या वाणांच्या भाताची लागवड करण्यात आली आहे.






