कबड्डीच्या लोकप्रियतेसाठी प्रयत्न करावेत

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सूचना
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी व कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. राज्य कबड्डी असोसिएशनसह सर्वांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या पुरुष संघाची कामगिरी उंचावली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, त्यांच्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी दिल्या. यावेळी सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी बहुमल्य अशा सूचना मांडल्या.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीची सभा तसेच कार्यकारिणी समितीच्या सभेचे आयोजन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयात करण्यात आले होते. कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत, त्यासाठी कबड्डीच्या प्रशिक्षकांना दर्जेदार आणि अद्ययावत प्रशिक्षण द्यावे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.

क्रीडा मार्गदर्शकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना करणे, क्रीडाविषयक शासनाच्या विविध योजना खेळाडूंपर्यंत पोहोचवणे याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, असोसिएशनचे कार्याध्यक्ष गजानन किर्तीकर, उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, उपाध्यक्ष अमरसिंह पंडीत, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रवींद्र देसाई, स्मिता जाधव, मनोज पाटील, जिल्हा प्रतिनिधी बाबुराव चांदेरे, नितीन बरडे, लिना करपे-कांबळे, सचिन भोसले, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. माणिक राठोड, राजेंद्र साळुंखे, प्रताप शिंदे, नितीन शिंदे, वासंती बोर्डे, गौतमी आरोसकर, डॉ. माधव शेजवळ, मनिषा काटकर, पंकज शिरसाट, गणेश शेट्टी, जे.जे. पाटील, विश्‍वास मोरे, कबड्डी असोसिएशनचे समन्वयक अविनाश सोलवट यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version