आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

पंढरपूर | प्रतिनिधी |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी वारीदरम्यान 17 ते 25 जुलै या काळात पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यामुळे यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. त्यामुळे यंदाही बहुतेक भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही.

यावर्षीही कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचं नियोजन सरकारनं केलं आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून, पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे.

Exit mobile version