कोकणात 16 ठिकाणी उपचार सेंटर
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यातील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी राज्यात 35 नवीन डायलेसिस केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 109 डायलेसिस मशिन आणि 25 आरओ प्लँट बसविण्यात येणार असून त्यासाठी लागणार्या उपकरणांच्या खरेदीसाठी आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयांतर्गत कोकण विभागातील चार जिल्ह्यांमधील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये 7 नवीन डायलेसिस केंद्र सुरु करण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात-2, रायगड-8, पालघर-2, रत्नागिरी-4 असे एकूण 16 नवीन डायलेसिस मशिन बसविण्यात येणार आहेत.
मूत्रपिंड विकाराच्या उपचारासाठी डायलेसिस महत्वाचा घटक असून ही सुविधा नागरिकांना उपजिल्हा रुग्णाल याच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यास त्याचा गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात 35 नवीन डायलसिस केंद्र आणि त्यासाठी 109 डायलेसिस मशिन खरेदीकरण्याकरीता 991 लाख रुपये मंजूर केले आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय काल सोमवार दि.25 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या या शासन निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एक डायलसिस केंद्र नव्याने सुरु करण्यात येणार असून त्याठिकाणी 2 डायलिसिस मशिन आणि 500 लिटर क्षमतेचा एक आरओ प्लँट बसविण्यात येणार आहे. त्यासोबतच यासाठी लागणार्या 14 अन्य उपकरण खरेदीसाठी देखील मान्यता देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात नवीन केंद्राची संख्या सर्वाधिक असून उपजिल्हा रुग्णालय पेण, रोहा, श्रीवर्धन आणि कर्जत येथे प्रत्येकी एक केंद्र आणि त्याठिकाणी प्रत्येकी दोन डायलसिस मशिन व आरओ प्लँट बसविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात एक केंद्र सुरु करण्यात येणार असून तेथे चार डायलिसिस मशिन बसविण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसचे एक नवीन केंद्र सुरु करण्यात येणार असून तेथे दोन मशिन बसविण्यात येणार आहेत.






