मुले व मुलीची एकत्रीत शिक्षण व्यवस्था राबविणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी
मुले आणि मुलींना एकत्र अभ्यास करण्याची आणि त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी शासनाने मुले आणि मुलींच्या स्वतंत्र शाळांचे विलनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील आठ शाळांचे विलनीकरण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुलांच्या आणि मुलींच्या स्वतंत्र शाळांचे विलीनीकरण केले जाणार आहेत. एकत्रित शिक्षण व्यवस्था राबविण्यात येणार आहे. सहशिक्षणामुळे समानतेचे वातावण निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला आहे. तसेच संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि सामाजिक समरसता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. मुलांच्या आणि मुलींच्या स्वतंत्र शाळांचे विलीनीकरण करून सह-शिक्षण व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सह-शिक्षण शाळा हे एक आधुनिक आणि सर्वसमावेशक शिक्षण मॉडेल म्हणून ठरणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने मुले व मुलींची एकत्रीत शिक्षण व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार 474 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 87 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हयात मुले आणि मुलींची स्वतंत्र शाळादेखील आहेत. या शाळांमध्ये मुले व मुली स्वतंत्र शिक्षण घेत आहेत. या शाळा एकत्र केल्या जाणार आहेत. शाळा समितीचा ठराव घेऊन ही प्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिली आहे. शासनाने निर्णय घेतला असला, तरी शाळा समिती आणि पालकांची काय भुमिका असणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
