रानपाखरं आश्रमशाळा तसेच इतर काही खाजगी शाळा होणार सुरु
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद राहिलेल्या शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्या संदर्भात एक नवीन नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्या नियमावलीनुसार आता रायगडातील बंद असलेली ज्ञानमंदिरे सुरु होणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि पालकवर्गाला उत्सुकता लागून राहिलेली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील रानपाखरं आश्रमशाळेच्या 121 पालकांनी दिलेल्या संमतीपत्रानुसार सदर शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये एकवाक्यता दिसून येत नसल्याने सध्यातरी या शाळांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान काही खाजगी शाळांनी पालकांच्या संमतीने आपले वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात देखील शाळांचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू करण्याबाबत चाचपणी सुरु करण्यात आली आहे. अजूनही अनेक पालक पाल्याला शाळेत पाठविण्याच्या तयारीत दिसत नाहीत. पालकांची पसंती ऑनलाईन शिक्षणालाच असून अद्यापही बरेच विद्यार्थी त्यांच्या मूळ गावीच आहेत. तर 80 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. रायगड जिल्ह्यातील शाळांचे सॅनिटाझेशन केली जात आहे. रायगड जिल्ह्यात 644 शाळा असून, सुमारे 1 लाख 44 हजार 565 विद्यार्थी आहेत. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 पासून रायगड जिह्यातील सर्वच शाळा बंदच आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयांबरोबरच सर्व स्तरांतील विद्यालये बंद आहेत.
पालकांच्या समंतीशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने याधीच जारी केल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांनी पालकांना ङ्गहमीपत्रा’विषयी माहिती दिली आहे. मात्र पालकांकडून मुख्याध्यापकांना हमीपत्र मिळालेले नाही. हमीपत्रासाठी पालकांना संपर्क केला तर पालकांकडून हमी पत्र देण्यासाठी नकार घंटा ऐकावयास येत आहे. दुसरीकडे हमीपत्राशिवाय शाळेत प्रवेश देणार नसल्याने पालकांमध्ये इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील फक्त रानपाखरं या आश्रमशाळेच्या 121 विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या संमतीनुसार सदर शाळा सुरु करण्यात येणार आहे. इतर शाळेेबाबत अजून काही निर्णय झालेला नाही.
निधी चौधरी , जिल्हाधिकारी रायगड
आमच्या संस्थेच्या शाळांचे वर्ग आम्ही 17 ऑगस्टपासून सुरु करणार आहोत. त्यासाठी कुठल्याही कारवाईला सामोरे जाण्याची देखील तयारी आहे. 80 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील संमती दिली आहे. मुले आणि मुली अशा वेगवेगळया तुकडया वेगवेगळया वेळेत सुरु करण्यात येणार आहेत.
अमर वार्डे, अध्यक्ष दत्ताजी खानविलकर एज्युकेशन ट्रस्ट