। नाशिक । प्रतिनिधी ।
राज्याचे ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण’ अशी पोस्ट करत करत हेलिकॉप्टरच्या लँडिंगनंतर बॅगा घेऊन जाणार्या पोलिसांचा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा वादात सापडला आहे. मुख्यमंत्री शिंदे नऊ बॅगांमध्ये बारा ते तेरा कोटी रुपये घेऊन नाशिकमध्ये आल्याचा थेट आरोप राऊत यांनी केल्याने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाला हा व्हिडिओ टॅग करण्यात आल्याने आयोग काय भूमिका घेणार? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील आठ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनदा नाशिकमध्ये आले. रविवारी (दि.12) महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते संध्याकाळी हेलिकॉप्टरने दाखल झाले. पोलिस मुख्यालयाजवळील मैदानावर हेलिकॉप्टर उतरले. मुख्यमंत्र्यानंतर काही पोलिस काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन उतरल्याचा व्हिडिओ राऊत यांनी ‘एक्स’वर शेअर केला. त्यासोबत ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले.. नुसता पैशांचा पाऊस… दोन तासांच्या दौर्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहोचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे’, अशी पोस्टही त्यांनी केली.
एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा वादात
