अनेक वयोवृध्द एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता
परिवहन मंत्र्यांकडे अलिबागच्या माजी नगरसेवकांची तक्रार
| रायगड | प्रमोद जाधव |
एसटी महामंडळाने एनसीएमसी अर्थात (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड या योजनेच्या माध्यमातून हायटेक होण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे कार्ड मिळविण्यासाठी नोंदणी करताना मशीनवर ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा स्वीकारला जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अलिबागच्या माजी नगरसेवकांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे तक्रार केली असून, यावर पर्याय शोधून ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ घेण्याचा फायदा व्हावा, अशी मागणी केली आहे.
कारभार कॅशलेस करण्यासाठी एसटी महामंडळाने 2016 मध्ये सुरु केलेली स्मार्ट कार्ड योजना सात वर्षांमध्ये बंद पडली. आता नव्या सरकारने त्या जागी एनसीएमसी अर्थात (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरु केली आहे. प्रवासातील पारदर्शकता आणणे, डिजिटल व्यवहारांना चालना देणे, एसटीचा प्रवास कॅशलेस बनविण्यासाठी एसटी महामंडळाने पुन्हा स्मार्ट कार्ड योजना सुरु केली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये एप्रिलमध्ये म्हणजे चार महिन्यांपूर्वी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, उरण, पनवेल, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा, माणगावमध्ये 24 ठिकाणी खासगी एजन्सीद्वारे काम सुरू आहे. त्यामध्ये आठ आगारांतील 11 स्थानकात या एजन्सी कार्यरत आहेत. काही एजन्सीमध्ये सकाळी आठ ते अकरा, तर काही एजन्सीमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत या एजन्सींचे काम चालते. एसटी महामंडळाकडून मिळणाऱ्या एनसीएमसी कार्डचा लाभ घेण्यासाठी महिला प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना प्राधान्य देण्यात आले आहे. एसटी महामंडळाने 65 ते 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक प्रवाशांकडून या योजनेसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानकांसह अन्य खासगी एजन्सीमध्ये नोंदणीसह कार्ड मिळविण्यासाठी गर्दी होत आहे. कार्डची नोंदणी करण्यासाठी अंगठ्याचे ठसे द्यावे लागत आहेत. मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिकांचे ठसे येत नाही. त्यामुळे ही मंडळी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा मशीनमध्ये स्वीकारला जात नसल्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. 65 ते 75 वर्षांतील ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून दुरावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अलिबागचे माजी नगरसेवक आर.के. घरत यांनी याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली आहे.
एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरु केली आहे. 65 ते 75 वर्षांवरील प्रवाशांना प्राधान्याने या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, हे कार्ड मिळविण्यासाठी नोंदणी करताना मशीनवर ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे स्वीकारले जात नाही. त्यामुळे या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आधारकार्डवरून स्मार्ट कार्ड देण्याची व्यवस्था करावी अथवा अन्य पर्याय उपलब्ध करून द्यावी.
– आर.के. घरत,
माजी नगरसेवक, अलिबाग






