आठ दिवसांत 13 लाख उकळले
। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल येथे राहणाऱ्या 62 वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून सायबर टोळीने तब्बल 13 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तब्बल आठ दिवस वृद्धाला घरातील एका खोलीत स्वतःला बंद करून ठेवण्यास भाग पाडत व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. अखेर पत्नीला संशय आल्याने हा प्रकार समोर आला.
तक्रारदार वृद्धाशी एका सायबर ठगाने संपर्क साधला. त्याने स्वतःची ओळख ‘भारतीय डेटा सेंटर’चा पोलीस अधिकारी रोहित कुमार अशी करून दिली. वृद्धाच्या नावाने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) कॅनरा बँकेत बनावट खाते उघडल्याचा तसेच त्यांच्या नावावरील सिमकार्डचा गुन्ह्यात गैरवापर झाल्याचा दावा आरोपीने केला. यानंतर टोळीतील आरोपींनी पोलीस गणवेशात आणि पोलिसांचा लोगो असलेल्या पार्श्वभूमीतून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत वृद्धाला कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी देण्यात आली. तसेच एका खोलीत स्वतःला बंदिस्त करून घेण्यास भाग पाडण्यात आले. वृद्धावर सतत व्हिडिओ कॉलद्वारे नजर ठेवण्यात आली. या प्रकरणातून सुटका करून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी सर्वोच्च न्यायालय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नावाचा धाक दाखवला. त्यानंतर वृद्धाकडून बँकेतील 8 लाख आणि 5 लाख रुपयांच्या मुदत ठेवी मोडून घेण्यात आल्या.
आरोपींनी वृद्धाला एकूण 13 लाख रुपये जळगाव येथील आयसीआयसीआय बँकेतील ‘ग्लोबल केमोटेच’ नावाच्या चालू खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले. दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हिडिओ कॉल करून घरातील सोने आणि अन्य बँक खात्यांमध्ये असलेल्या पैशांची माहिती मागण्यात आली. यावेळी वृद्धाच्या पत्नीला संशय आल्याने त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.
