। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनीतील मोहोपाडा ते पराडे येथे जाणाऱ्या रस्त्यावर 72 वर्षीय वयोवृद्धाचा अज्ञात स्कूटी स्वाराच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली. खोपोली येथील रविंद्र शांताराम मोरे हे पराडे आदिवासी वाडी समोरील रोडवर रस्ता ओलांडत असताना पराडे बाजूकडून येणाऱ्या अज्ञात स्कूटीवरील चालकाने त्याच्या ताब्यातील स्कूटी भरधाव वेगाने चालवून रविंद्र मोरे यांना धडक देऊन अपघात केला व त्यांना रोडच्या बाजूला उभे करून निघून गेला. यावेळी रविंद्र मोरे यांना चक्कर येऊन ते खाली पडले असता पोलिसांनी त्यांना ग्रामीण रूग्णालय चौक येथे उपचारासाठी नेले असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रविंद्र मोरे यांचा मुलगा तेजस मोरे रा. खोपोली याने आपल्या वडिलांच्या अपघाताची तक्रार दाखल केली असून, अज्ञात स्कूटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पवार अधिक तपास करीत आहेत.







